Maharashtra Weather Update : गेल्या सप्टेंबर महिन्यात मोसमीं पावसाची जोरदार हजेरी लागली. यामुळे ऑगस्टपर्यंत दुष्काळाच्या छायेत वावरत असलेला महाराष्ट्र दुष्काळाच्या विळख्यातून थोडासा बाहेर निघाला.
ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या घशाला कोरड होती, धरणांमध्ये पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत होता, विहिरीनी अक्षरशा तळ गाठलेला होता.
अशा या दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले होते. खरीप पिकांच तर सोडाच पण गुराढोरांना पिण्यासाठी देखील पाणी राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु सप्टेंबर महिना आला, लाडक्या गणरायाचे आगमन झाले आणि सर्वत्र जोरदार पाऊस देखील झाला.
पण राज्यातील काही भागात सप्टेंबर मध्ये देखील चांगला पाऊस झालेला नाही. यामुळे तेथील शेतकरी चिंतेतच आहेत. दरम्यान आता देशभरात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. यामुळे रब्बी हंगामाच्या सुरुवातीला परतीचा पाऊस पडायला हवा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात कसे हवामान राहणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आयएमडीने सांगितल्याप्रमाणे, देशात मान्सूनचे चक्राकार वाऱ्यांची स्थीती पश्चिम बंगालच्या पट्ट्यात आहे.हिमालयीन भागात म्हणजेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, या राज्यांमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
परंतु महाराष्ट्रात 11 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कुठेच पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही. राज्यातून मान्सूनने माघार घेतली आहे. म्हणून आता परतीच्या पावसाची शक्यता खूपच कमी असल्याचे हवामान विभागाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. मराठवाड्याचा विचार केला असता या विभागातही 14 ऑक्टोबरपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.
विशेष म्हणजे मराठवाड्यात आता उन्हाच्या तीव्र झळा पाहायला मिळणार आहेत. येत्या तीन ते चार दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी परतीच्या पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाला हवामान विभागातील तज्ञांनी आणि कृषी तज्ञांनी रब्बी हंगामातील पिकांची उपलब्ध पाण्यावरच पेरणी करून घेतली पाहिजे असा सल्ला दिला आहे.
येणाऱ्या काळात परतीच्या पावसाची शक्यता कमीच राहणार असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन कापूस मका यांसारख्या पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर रब्बी पीकांची पेरणी करून घेतली पाहिजे असा सल्ला राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
एकंदरीत महाराष्ट्रात गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला मान्सून आता माघारी फिरला आहे. यावर्षी महाराष्ट्रात परतीचा पाऊस समाधानकारक असा बरसला नसल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. याचा परिणाम रब्बी हंगामावर देखील होऊ शकतो आणि पीक पेरणीत मोठी घट येऊ शकते.