Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या विभागात अवकाळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणातून अवकाळी पावसाने माघार घेतली आहे मात्र अजूनही विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस बरसत आहे.
अवकाळी पावसाची तीव्रता कमी आहे. मात्र मध्यंतरी विदर्भात गारपीट झाली होती. गारपिटीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यातील गहू आणि हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने वाढवलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतले आहे.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसला आहे. अशातच आता हवामान खात्याने आगामी पाच ते सहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थात 16 फेब्रुवारी 2024 रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे.
अर्थातच, अजूनही राज्यावर असलेल्या अवकाळी पावसाचे सावट पूर्णपणे नाहीसे झालेले नाही. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आयएमडीने दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी ?
आयएमडी कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील वर्धा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात आज देखील हवामान कोरडे राहणार आहे. तसेच उद्यापासून पाच ते सहा दिवस विदर्भसहित संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आज विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पण उद्यापासून 29 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील असा अंदाज डख यांनी दिला आहे.
पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज
महाराष्ट्रातील हवामानाबाबत पुणे वेधशाळेने मोठी अपडेट दिली आहे. यानुसार महाराष्ट्राच्या आसपास दोन सिस्टीम्स तयार झाल्या आहेत. मध्य छत्तीसगढवर हवेच्या वरील स्तरात एक चक्रिय स्थिती आहे. या चक्रीय स्थिती पासून उत्तर कर्नाटकापर्यंत एक द्रोणिका रेषा आहे.
यामुळे विदर्भामध्ये आज अर्थातच 16 फेब्रुवारी 2024 ला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र नंतर मग पुढील पाच-सहा दिवस राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. यामुळे आजच्या दिवसासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.