Maharashtra Weather Update : 10 सप्टेंबर पासून सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागत आहे.
कालपासून राज्यातील काही भागात पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागली. खरंतर दहा सप्टेंबर नंतर पावसाने उघडीप दिली म्हणून शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत आले होते.
ऑगस्टमध्ये पण पावसाचा खंड आणि आता सप्टेंबर मध्ये पण पावसाचा खंड पडतो की काय अशी भीती शेतकऱ्यांना होती. पण 19 सप्टेंबरला पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला.
19 सप्टेंबर अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यातील विविध भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. पण पावसाचा जोर वाढला तो 22 सप्टेंबर, शुक्रवारपासून अर्थातच गौरी पूजनाच्या दिवसापासून. पण आता पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला आहे. वास्तविक ऑगस्ट महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस झाला यामुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली होती.
काही भागात तर पावसाअभावी पिके करपलीत सुद्धा. दरम्यान या सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला असल्याने ऑगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी बऱ्यापैकी भरून निघेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. अशातच हवामान खात्याने राज्यात 28 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात 28 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.
आज अर्थातच 27 सप्टेंबर रोजी राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नासिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या राज्यातील मुंबई,ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.