Maharashtra Weather Update : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जोरदार पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळाला आहे. तर राज्यात कोसळत असलेल्या या मुसळधार पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यात गेल्या काही तासात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे विदर्भातील जवळपास 40 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त कोकणात देखील मुसळधारा सुरू आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण आठवडा जोरदार पावसाचा राहणार असा अंदाज आहे.
यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ती म्हणजे येत्या काही तासात राज्यातील काही भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरंपाहता कोकणात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता तयार होत आहे.
कोकणातील अनेक नद्या आता धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आल्या आहेत. परिणामी कोकणात सावधानतेचा इशारा देण्यात आला असून आता येत्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पुराचा धोका आणखी वाढणार आहे. आयएमडीने येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही शहरांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच पूर्व विदर्भातील काही भागात येत्या तीन ते चार तासात पावसाची तीव्रता वाढणार असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभागात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी मुंबई आणि पुण्यातही मुसळधार पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
एकंदरीत पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पूर्व विदर्भातील काही भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज असल्याने संबंधित भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक सावधानता बाळगून कामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ओढ दिलेल्या पावसाने जोरदार कमबॅक केला असल्याने सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.