Maharashtra Weather Update : ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवलेला मान्सून सप्टेंबर मध्ये मनसोक्त बरसला आहे. संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाने गाजवला आहे. राज्यातील विविध भागात या महिन्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
खरंतर सप्टेंबर चा पहिला आठवडा महाराष्ट्रात खूपच कमी प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे सप्टेंबर महिना देखील कोरडा जाणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र गणरायाच्या आगमनासोबतच मुसळधार पावसाने देखील महाराष्ट्रात हजेरी लावली. त्यापूर्वी सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला होता.
मात्र 11 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर ओसरला आणि जवळपास 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात कुठेच मुसळधार पाऊस झाला नाही. मात्र 19 तारखेला, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि याच दिवसापासून वरूणराजा देखील महाराष्ट्रावर मेहरबान झाला.
गणेश चतुर्थीच्या दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मध्यंतरी विदर्भातील नागपूर विभागात तर ढगफुटी सारखा पाऊस झाला. 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर अर्थातच संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात यावर्षी चांगल्या जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे ऑगस्ट महिन्यात दुष्काळाचे उंबरठ्यावर बसलेल्या महाराष्ट्राला सप्टेंबर महिन्यात मोठा दिलासा मिळाला आहे.
परिणामी राज्यातील बळीराजा सुखावला असल्याचे चित्र आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये मध्यम तर, काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यानंतर मात्र राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. दोन ऑक्टोबर नंतर अर्थातच गांधी जयंती नंतर राज्यातील बहुतांशी भागातून पाऊस गायब होणार आहे. पण एक ऑक्टोबरनंतर पुढील 2 दिवसांसाठी भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
राज्याच्या उर्वरित भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देईल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. तसेच हवामान खात्याने राजधानी मुंबईसह उपनगरांमधील काही भागांत पावसाच्या तुरळक सरींची अधूनमधून बरसात होऊ शकते असा अंदाजही वर्तवला आहे. पुढच्या किमान दहा दिवसांसाठी मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.