Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. 25 नोव्हेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली.
यानंतर 26 तारखेला राज्यातील काही भागांमध्ये गारपिट झाले तर काही ठिकाणी जोराचा अवकाळी पाऊस बरसला. काल देखील राज्यात अवकाळी पावसाचे तांडव पाहायला मिळाले आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी आणखी एक तातडीचा मेसेज दिला आहे.
हवामान खात्याने आज विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने याबाबतची माहिती ट्विटरवर सार्वजनिक केली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात गारपिटीसह अचानक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे आज विदर्भामध्ये ताशी तीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने जोरदार वारे वाहणार आहेत. गारपीट, अवकाळी पाऊस जोरदार वारे या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे. यामुळे आज या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. आज या भागात 64.5 ते 115.6 मिमी इतका पाऊस होईल असा अंदाज आहे.
दरम्यान, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी आगामी पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्यांनी काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज दिला आहे. त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता असल्याचे सांगितलं आहे. पण आता महाराष्ट्रात कुठेच गारपिट होणार नाही असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. मात्र एक डिसेंबर नंतर हळूहळू महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर येण्याची शक्यता आहे. शनिवार दि.2 डिसेंबर पासून सध्याची पावसाची प्रणाली विरळ होईल आणि वातावरण निवळणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.