Maharshtra Board 10th And 12th Result : नुकताच सीबीएससी बोर्डाचा बारावीचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कधी जाहीर होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्र बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गाचे निकाल मे अखेरपर्यंत लागतील अशी शक्यता बोर्डाने व्यक्त केली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांना पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी काही महत्त्वाचे दाखले काढून ठेवावे लागणार आहेत. विद्यार्थी त्यांच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रावरून या दाखल्यांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी पुढील वर्गातील प्रवेशासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे), अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते), एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते), केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते), भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र, अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे काढून ठेवावीत.
या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र येथून यासाठी अर्ज करता येणार आहे. हे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांना काही शुल्क देखील भरावे लागणार आहे. तथापि विद्यार्थ्यांनी मे अखेरपर्यंत ही सर्व कागदपत्रे जमवून ठेवावीत जेणेकरून ऐनवेळी धावपळ होणार नाही असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
दहावी, बारावीचा निकाल कोणत्या तारखेला लागणार?
महाराष्ट्र बोर्डाकडून यावर्षी बारावीचा निकाल 25 मे पर्यंत अर्थातच पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दहावीच्या निकालाबाबत बोलायचं झालं तर इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल हा 31 मे 2024 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकाल जाहीर करण्याची कारवाई जवळपास अंतिम टप्प्यात आली असून लवकरच निकाल जाहीर होणार आहे. तथापि बोर्डाच्या माध्यमातून अजून निकालाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. मात्र मे महिन्याच्या शेवटी पर्यंत निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी कुठे अर्ज करणार
बारावीच्या निकालानंतर ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी देखील सादर करावे लागणार आहे. दरम्यान हे जात प्रमाणपत्र पडताळणी म्हणजेच कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सरकारच्या https://www.barti.com किंवा http://ccvis.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट साठी ऑनलाईन अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधिताने समितीला ऑफलाइन प्रस्ताव देखील देणे अपेक्षित असते. म्हणजे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर समाज कल्याण विभागाकडे जाऊन ऑफलाइन प्रस्ताव देखील द्यावा लागतो.