Mhada Mumbai Lottery : म्हाडा मुंबई मंडळाने तब्बल चार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर 4 हजार 82 घरांसाठी सोडत काढली आहे. मुंबई ही स्वप्ननगरी, या स्वप्ननगरीत घर असावे अशी आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे. पण स्वप्ननगरीत घर घेणं म्हणजेच स्वप्नाच्या पलीकडची गोष्ट आहे.
कारण की राजधानी मुंबईत घरांच्या किमती गेल्या काही दशकात विक्रमी वाढल्या आहेत. म्हणून की काय सर्वसामान्य लोक म्हाडा कडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या दरातील घरांचीच आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाने 2019 मध्ये मुंबईमध्ये घरांची सोडत काढली होती.
2019 नंतर मुंबई कार्यक्षेत्रात म्हाडाची सोडतच निघाली नाही. यामुळे गेल्या वर्षांपासून म्हाडा मुंबई मंडळ नेमकी घरांसाठी सोडत केव्हा काढणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. आता म्हाडा मुंबई मंडळाने 4 हजार 82 घरांसाठी सोडत काढली आहे.
यासाठी सध्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र माडांच्या या सोडतीमध्ये घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. म्हणून या घरांसाठी नागरिकांनी फारसा प्रतिसाद दाखवलेला नाही. मुंबई मंडळाची सोडत म्हटले की लाखोंच्या संख्येने अर्ज दाखल होतात.
मात्र यंदा म्हाडाने काढलेल्या या सोडतीसाठी 62 हजाराहून अधिक लोकांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे केवळ 42 हजार लोकांनी यासाठी अनामत रकमेसह अर्ज सादर केला आहे. अर्थातच लाखोंच्या संख्येने मुंबई मंडळाच्या घर सोडतीला अर्ज सादर व्हायचे पण यंदा ही संख्या कमी झाली आहे.
यामुळे म्हाडा मुंबई मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला आता पंधरा दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. आधी 26 जून 2023 ही अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक होती.
आता दहा जुलै 2023 पर्यंत इच्छुक नागरिकांना घरांसाठी अर्ज सादर करता येणार आहे. तसेच 10 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कम भरता येणार आहे आणि 12 जुलै 2023 पर्यंत आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.
अर्ज विक्री आणि स्वीकृतीला मुदतवाढ मिळाली असल्याने 18 जुलै 2023 रोजी निघणारी सोडत देखील रद्द करण्यात आली आहे. आता सोडतीची नवीन तारीख मंडळाकडून जाहीर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा मुंबई मंडळाची ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढली जाणार आहे.
यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वेळ दिल्यानंतरच सोडतीची तारीख जाहीर होणार आहे. दरम्यान, अर्ज विक्री आणि स्वीकृतीला मुदत वाढ देण्यात आली असल्याने मुंबई मंडळाच्या या घरांसाठी अर्जदारांची संख्या वाढेल आणि किमान एक लाख अर्ज यासाठी दाखल होतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.