Mhada Mumbai News : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच एम एम आर क्षेत्रात घर घेणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या काही वर्षात देशाची आर्थिक राजधानी मुंबई घरांच्या वाढत्या किमतीसाठी विशेष चर्चेत आली आहे.
मुंबई प्रमाणेच एम एम आर क्षेत्रात देखील घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना या भागात घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोच्या घरांचा पर्याय परवडतो. खरतर मुंबई मंडळाची नुकतीच 4,082 घरांसाठी लॉटरी निघाली आहे.
यात मुंबईमध्ये घर घेणाऱ्या हजारो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तसेच म्हाडा कोकण मंडळाने देखील यावर्षी 10 मे रोजी साडेचार हजारांपेक्षा अधिक घरांसाठी लॉटरी काढली होती.
अशातच आता म्हाडा कोकण मंडळ पुन्हा एकदा जवळपास 5,000 घरांसाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर लॉटरी काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यासाठीचे वेळापत्रक देखील मंडळाकडून तयार करण्यात आले आहे. या आगामी सोडतीत समाविष्ट केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती देखील समोर आल्या आहेत.
केव्हा निघणार लॉटरी
म्हाडा कोकण मंडळ यावर्षी दुसऱ्यांदा लॉटरी काढणार आहे. यावर्षीच्या दुसऱ्या लॉटरीत जवळपास 5000 घरांचा समावेश केला जाणार आहे. या 5000 घरांसाठी पुढल्या महिन्यात म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. याला म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.
सदर अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, कोकण मंडळाच्या या 5,000 घरांसाठी 11 सप्टेंबर पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच ही प्रक्रिया ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. नऊ ऑक्टोबर पर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहील आणि 23 ऑक्टोबरला या सोडतीमध्ये अर्ज करणाऱ्या अर्जदारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.
अंतिम यादी जाहीर झाली की तेथून तीन दिवसांनी म्हणजेच 26 ऑक्टोबरला या घरांसाठी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. यंदा विजयादशमी म्हणजेच दसरा 24 ऑक्टोबरला येतोय. अशा परिस्थितीत विजयादशमीच्या मुहूर्तावरच कोकण मंडळाकडून हजारो लोकांना हे एक मोठ गिफ्ट राहणार आहे.
कोणत्या घरांचा समावेश राहणार
कोकण मंडळाच्या या आगामी लॉटरीमध्ये गेल्या लॉटरीत ज्या घरांची विक्री झाली नाही त्या घरांचा समावेश केला जाणार आहे. याव्यतिरिक्त पनवेल मधील खाजगी विकासकांकडून तयार करण्यात आलेल्या 417 घरांचा, डोंबिवलीतील खाजगी विकासकांकडून तयार करण्यात आलेल्या 612 घरांचा, तसेच इतर अन्य खाजगी विकासकांकडून तयार करण्यात आलेल्या 200 ते 2500 घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे.
या येत्या सोडतीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, मीरा रोड आदी भागातील घरे असतील. या लॉटरी साठी अजून घरांची निश्चिती करण्यात आलेली नाही मात्र जवळपास 5000 घरांसाठी ही लॉटरी राहील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
घरांच्या किमती किती राहणार?
या लॉटरीतील घरांच्या किमती मुंबई मंडळाच्या लॉटरी पेक्षा कमी राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या लॉटरीमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती 9 लाख 89 हजार पासून ते 42 लाखांपर्यंत राहणार आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त घर वसई येथे राहणार आहे तर सर्वात महागडे घर विरार बोळींज या प्रकल्पातील राहणार आहे.