Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात घर घेऊ इच्छिणारे अनेक लोक आता म्हाडा आणि सिडकोच्या घरांना विशेष पसंती दाखवू लागले आहेत.
म्हाडा आणि सिडकोकडून परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे म्हाडा आणि सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीला नागरिकांच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
दरम्यान, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी म्हाडा कोकण मंडळाने 5,311 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सप्टेंबर 2023 मध्ये सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, या पाच हजार 311 घरांपैकी 2278 घरांसाठी 24 हजार 303 अर्ज सादर झाले आहेत आणि उर्वरित घरांसाठी 23 हजार 303 अर्ज सादर झाले आहेत. यापैकी पात्र अर्जदारांची अंतिम यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
एवढेच नाही तर ही सोडत गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातच काढली जाणार होती. 13 डिसेंबर 2023 ला कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी संगणकीय सोडत काढण्याचे नियोजन होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव त्यावेळी ही सोडत निघू शकली नाही.
तेव्हापासून कोकण मंडळाची ही सोडत अखेर निघणार केव्हा हा प्रश्न अर्जदारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.मात्र अजूनही या सोडतीला मुहूर्त मिळालेला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, म्हाडा कोकण मंडळ ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यासाठी आग्रही आहे.
परंतु मुख्यमंत्री महोदयांची वेळच मिळत नाहीये. मध्यंतरी उद्या अर्थातच 26 जानेवारी 2024 ला ही सोडत निघू शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. विशेष म्हणजे मंडळाच्या माध्यमातून या पार्श्वभूमीवर तयारी देखील सुरू करण्यात आली होती.
मात्र मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मिळत नसल्याने 26 जानेवारीला देखील ही सोडत निघणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अशातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठीच्या संगणकीय सोडती बाबत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे.
अतुल सावे यांनी म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांची वेळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. त्यामुळे ही सोडत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निघेल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अर्थातच मुख्यमंत्री महोदय यांनी तारीख आणि वेळ निश्चित केल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केव्हाही ही सोडत निघू शकते. निश्चितच हजारो अर्जदारांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.