Mhada News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करताना सर्वसामान्याच्या नाकी नऊ येत आहेत. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य लोक जीवाचा आटापिटा करत आहेत. तसेच प्रयत्नांची पराकाष्टा करूनही वाढत्या किमतीमुळे अनेकांना घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करता येत नाही.
अशा परिस्थितीत स्वप्नातील घरांसाठी अनेक जण म्हाडाच्या घरांची वाट पाहत असतात. म्हाडाची परवडणारे घरे खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र असे असले तरी म्हाडाने विकसित केलेली अनेक घरे अजूनही विक्री विना पडून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाची संपूर्ण राज्यभर 11000 हून अधिक घरे तसेच अनेक भूखंड विक्री विना पडून आहे. या घरांची आणि भूखंडांची एकत्रित किंमत जवळपास 3000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
अशा परिस्थितीत म्हाडाने या विक्री विना पडून असलेल्या घरांच्या विक्री संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडा या विक्री विना पडून असलेल्या घरांची, भूखंडांची तसेच व्यावसायिक गाळ्यांची आता खाजगी संस्थेची मदत घेऊन विक्री करणार आहे.
यासाठी म्हाडाचे संबंधित मंडळ निविदा प्रक्रिया राबवणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच प्रक्रियेतून बांधकाम, विपणन क्षेत्रांतील खाजगी संस्थेची नियुक्ती करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान खाजगी संस्थेच्या माध्यमातून विक्री केल्या जाणाऱ्या या घरांसाठी ग्राहकांना सुरुवातीला एकूण मालमत्तेच्या किमतीच्या पंचवीस टक्के एवढी रक्कम भरावी लागणार आहे आणि उर्वरित 75 टक्के रक्कम सुलभ हफ्त्याने देता येणार आहे.
खरे तर म्हाडाची पडून असलेली ही घरे विक्रीसाठी अनेकदा सोडत काढली गेली होती. मात्र तरीही या घरांची विक्री होऊ शकली नाही. मग म्हाडाने ही घरे प्रथम येणाऱ्यासं प्राधान्य या योजनेअंतर्गत समाविष्ट करून विक्रीचा निर्णय घेतला.
परंतु या विक्री विना पडून असलेल्या घरांना नागरिकांनी प्रतिसाद दाखवला नाही. अशा परिस्थितीत आता या घरांची विक्री खाजगी संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात विरार – बोळींजमधील पाच हजार घरांच्या विक्रीचे आव्हान कोकण मंडळ आणि खासगी संस्थेसमोर राहणार आहे.
दरम्यान जी खाजगी संस्था या घरांची आणि भूखंडांची विक्री करणार आहे तिला एकूण किमतीच्या पाच टक्के एवढा मोबदला दिला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रभर म्हाडाची ११ हजार १८४ घरे, ७४८ भूखंड आणि २९८ अनिवासी गाळ्यांची विक्री होत नाहीये.
ही घरे, भूखंड आणि दुकाने यांची एकूण किंमत तीन हजार ११४ कोटी रुपये आहे. आता याच सदनिकांसाठी आणि भूखंडांसाठी खाजगी संस्थेची मदत घेतली जाणार आहे.