Modi Sarkar Scheme : नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरेतर पुढील वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा देखील थरार रंगणार आहे.
या पार्श्वभूमीवर आतापासूनचं सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या अनुषंगाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमती कमी केल्या होत्या. याशिवाय केंद्र सरकारने भारत ब्रँड अंतर्गत 27.50 प्रति किलो या दरात गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले आहे.
दहा किलो आणि तीस किलोच्या बॅगमध्ये हा भारत आटा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून भारत आटा सर्वसामान्यांना मिळतं आहे.
सध्या भारतीय बाजारात गव्हाच्या पिठाचा भाव हा 35 रुपय प्रति किलोच्या घरात आहे. विशेष म्हणजे ब्रँडेड कंपन्यांचा आटा यापेक्षाही महाग आहे. यामुळे स्वस्तात भारत ब्रँड अंतर्गत सरकारने आटा उपलब्ध करून दिला आहे.
अशातच आता भारत ब्रँड अंतर्गत सर्वसामान्यांना तांदूळ देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी 25 रुपये प्रति किलो या भावात तांदूळ उपलब्ध होणार आहेत.
सध्या बाजारात बासमती तांदूळ पन्नास रुपये प्रति किलोच्या आसपास आणि साधा तांदूळ 43 रुपये प्रति किलोच्या आसपास विकला जात आहे. मात्र भारत सरकार 25 रुपये प्रति किलो या स्वस्त भावात सर्वसामान्यांना तांदूळ उपलब्ध करून देणार आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भात लागवडीखालील क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादनात घट येण्याची भीती आहे.
हेच कारण आहे की किरकोळ बाजारात तांदळाचे भाव आगामी काळात कडाडण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान किरकोळ बाजारात संभाव्य दर वाढ लक्षात घेता शासनाने आता स्वस्तात तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या स्वस्तातील तांदळाची नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड), राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) आणि केंद्रीय भांडार केंद्रामधून विक्री केली जाणार आहे.