Monsoon News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खूपच कमी पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात गेल्या वर्षी झालेल्या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा 12 टक्के कमी पाऊस झाला. यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.
खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. कमी पावसामुळे रब्बी हंगाम देखील प्रभावित झाला आहे. यामुळे 2024 मध्ये मान्सून कसा राहणार, यावर्षीही गेल्या वर्षी प्रमाणे मान्सून कमकुवत राहणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
दरम्यान आता हळूहळू अनेक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यंदा पावसाळा कसा राहणार याबाबत प्राथमिक अंदाज देण्यास सुरुवात केली आहे.
भारतातील खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या प्रतिष्ठित संस्थेने अर्थातच स्कायमेटने सुद्धा यंदाच्या पावसाळ्याबाबत पहिला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
स्कायमेटने आपल्या पहिल्या हवामान अंदाजात यावर्षी अर्थातच मान्सून 2024 मध्ये सामान्य मान्सून राहील असा अंदाज वर्तवला असेल. म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सामान्य मान्सूनची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
स्कायमेटने म्हटल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यात एलनीनोचा प्रभाव कमी होईल आणि यामुळे मान्सून काळात सामान्य पाऊस होईल असा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी सुद्धा मान्सून 2024 बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी म्हटल्याप्रमाणे जून 2024 पर्यंत एल निनोचा प्रभाव ओसरणार आहे.
म्हणजेच यंदाचा संपूर्ण उन्हाळा हा एलनिनोमध्ये जाणार आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा हा मोठा घातक राहील, उन्हाळ्यात विक्रमी तापमानाची नोंद होईल आणि यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाही.
मात्र उन्हाळ्यानंतर एल निनोचा प्रभाव कमी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. म्हणजे यंदाच्या मान्सूनवर एलनिनोचा प्रभाव राहणार नाही. तसेच ला-निना देखील यंदाच्या मान्सूनवर सक्रिय होण्याची शक्यता नाहीये. यामुळे 2024 मधील पावसाळा हा सामान्य राहील असा अंदाज देण्यात आला आहे.
तथापि, भारतीय हवामान विभाग एप्रिलमध्ये यंदाच्या मान्सूनबाबतचा आपला पहिला हवामान अंदाज जारी करणार आहे आणि तेव्हाच यावर्षी मान्सून कसा राहील याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकणार आहे.