Monsoon News : भारतासह संपूर्ण जगात टेक्नॉलॉजीची व्याप्ती वाढली आहे. आता सर्वच क्षत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने आता अनेक कामे सोपी झाली आहेत. हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी देखील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या हायटेक टेक्नॉलॉजीमुळे हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत वेगाने पोहचत आहे.
हवामानाचा पूर्व अंदाज शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. मात्र, यंदा हवामान विभागाच्या हवामान अंदाजाला देखील मान्सूनने चकवा दिला आहे. एवढ प्रगत तंत्रज्ञान असतानाही मान्सूनचा अंदाज बांधताना शास्त्रज्ञांना अवघड बनत आहे. दरम्यान, मेघराजा केव्हा बरसणार म्हणून शेतकरी चिंतातूर आहेत. जवळपास जून महिना संपत चालला आहे.
तरीही मान्सून राज्यात सर्व दूर पोहोचलेला नाही. पूर्व मोसमी पावसाने देखील उघडीप दिली आहे. आज पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार राज्यातील काही भागात पाऊस पडला देखील. मात्र अजूनही राज्यात सर्व दूर पाऊस झालेला नाही. एकंदरीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करूनही हवामानाचा अचूक अंदाज अजूनही कोणालाच वर्तवता येत नसल्याचे जाहीर होत आहे.
मात्र पूर्वी लोक कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय आणि मशीनशिवाय पावसाची अचूक माहिती देत असत. लोक म्हणी आणि कवितांमध्ये पाऊस पडण्याचे आणि न पडण्याचे संकेत सांगायचे. निश्चितच हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण महाकवि घाघ हे एक असे कवि होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून तसेच म्हणींच्या माध्यमातून लोकांना पावसाबाबत मोठी माहिती दिली आहे.
ते खूपच दूरदर्शी होते. त्यांच्याकडे दैवीय दूरदृष्टी होती असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्यांना कृषी पंडित आणि महाकवीची उपाधी प्राप्त आहे. परंतु ते शाळेत गेलेले नाहीत. अशिक्षित असतानाही मात्र ते शेतीची, हवामानाची, निसर्गाची नाडी चांगलीच ओळखून होते. दरम्यान आज आपण त्यांच्या कवितेमधल्या काही ओळी किंवा म्हणी जाणून घेणार आहोत ज्यातून आपल्याला मान्सूनबाबत बरेच काही शिकायला मिळणार आहे.
दिन में गर्मी रात में ओस, कहें घाघ बरखा सौ कोस :- महाकवि घाघ हिंदी भाषेत कविता रचत. ते हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांना महाकवीचा दर्जा प्राप्त आहे. त्यांना कृषी पंडित म्हणूनही ओळखलं जातं. कारण की त्यांच्या कविता या कृषीशी संबंधितच आहेत. त्यांनी निसर्गावर अनेक ओवी लिहल्या आहेत. ही ओळ देखील त्यापैकीच एक आहे. या ओळीत त्यांनी जर दिवसा उष्णतेमुळे ढग तयार झाले नाहीत किंवा रात्री दव पडल्यामुळे सर्व ओलावा निघून गेला तर पाऊस पडणार नाही असं सांगितलं आहे. या ओळीवरून हे स्पष्ट होते की, दिवसा उकाडा असेल आणि रात्री दव पडली तर पाऊस पडणार नाही असे गृहीत धरले जाऊ शकते.
सब दिन बरसो दखिना बाय, कभी न बरसो बरसा पाय :- महाकवी घाघ या ओळींद्वारे पाऊस केव्हा पडू शकत नाही याबाबत बोलत आहेत. या ओळीत त्यांनी असं म्हटलंय की, जेव्हा वारा दक्षिण पश्चिमेकडून म्हणजेच नैऋत्येकडून वाहतो आणि ढग पूर्वेकडे नेत नाही, तेव्हा पाऊस पडत नाही. ढग पूर्वेकडे सरकले की, पर्वतशिखरांशी आदळल्यानंतर पाऊस पडतो. जर ढग पूर्वेकडे सरकले नाहीत तर पाऊस पडणार नाही. म्हणजे या ओळींमधून महाकवी घाघ यांनी पावसासंदर्भात एक महत्त्वाचे संकेत दिले आहे. अशिक्षित असतानाही हवामानाचे किती अचूक निरीक्षण त्यांनी केलंय हे या ओळीवरून स्पष्ट होतंय.
जेठ मास जो तपै निरासा, तो जानों बरखा की आसा :-
या ओळींमध्ये महाकवी यांनी जेष्ठ महिन्यात जर जास्त उष्णता असेल तरच चांगला पाऊस पडतो अस म्हटलं आहे. त्यांनी या ओळींमध्ये जेष्ठ महिन्यात अति उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे ढग तयार होतात ज्यातून पाऊस पडतो असं निरीक्षण नोंदवल आहे. ही देखील ओळ पावसा संदर्भात महत्त्वाची माहिती देत आहे.
जै दिन जेठ बहे पुरवाई, तै दिन सावन धूरि उड़ाई : महाकवी घाघ या ओळीत असं सांगतात की, जेष्ठ महिन्यात पूर्वेचे वारे अधिक दिवस वाहील्यास श्रावण महिन्यात दुष्काळ पडण्याची शक्यता असते. हे त्यांनी त्यांच्या निरीक्षणावरून आणि अनुभवावरून या ठिकाणी मांडले आहे. एकंदरीत ज्येष्ठ महिन्यात अशी परिस्थिती जर तयार झाली तर श्रावण महिन्यात दुष्काळ पडतो असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
दिन के बद्दर, रात निबद्दर, बहे पुरवाई झब्बर-झब्बर, कहै घाघ कुछ होनी होई, कुआं खोदि के धोबी धोई :- या ओळीत घाघ यांनी दुष्काळाबाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दुष्काळ केव्हा पडतो याबाबत येथे स्पष्ट सांगितले आहे. ते म्हणतायत की, दिवसा ढगाळ आणि रात्री आकाश पूर्ण निरभ्र असेल आणि यासोबतच पूर्वेचे वारे जोरात वाहत असतील तर त्यावर्षी दुष्काळ पडणार हे जवळपास निश्चित असते.
श्रावण शुक्ला सप्तमी, डूब के उगे भान, तब ले देव बरिसिहें, जब सो देव उठान :- या ओळीत घाघ यांनी कार्तिक एकादशीला केव्हा पाऊस पडू शकतो याबाबत सांगितलं आहे. ते म्हणतायत की, श्रावण शुक्ल सप्तमीला ढगांमध्ये बुडून पुन्हा सूर्य उगवला, तर कार्तिक महिन्यात देवोत्थान एकादशीपर्यंत पाऊस पडतो. निश्चितच, आपल्यापैकी अनेकांनी कार्तिक एकादशीला पाऊस पाहिला असेलच, यावरून महाकवी घाघ यांची दूरदृष्टी आपल्या लक्षात येते. त्यांचे निसर्गामधील अचूक निरीक्षण या ओवीमधून समोर येत आहे.