Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात फक्त अन फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरु आहे. अगदी गाव खेड्यापासून ते मंत्रालयापर्यंत या योजनेची चर्चा आहे. गल्ली ते दिल्ली पर्यंत चर्चेत असणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून एका वर्षात 18 हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिला पात्र राहणार आहेत. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला यासाठी पात्र राहतील. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी एक जुलैपासून ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. याचा लाभ मात्र एक जुलैपासूनच मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. त्यावेळी जुलै महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील.
सध्या या योजनेचा अर्ज भरण्यास महिलांची मोठी गर्दी होत आहे. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले जात आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.
या ॲप्लिकेशनच्या मदतीने घरबसल्या महिलांना अर्ज करता येणार आहे. मात्र अर्ज करताना कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करणे आवश्यक आहे. जर कागदपत्र अपलोड करताना चुका झाल्यात तर अर्ज थेट बाद केला जाणार आहे.
नुकतेच शासनाने या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रे कशी अपलोड करायची या संदर्भात सूचना जारी केली आहे. यानुसार, आज आपण लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणते कागदपत्रे लागणार?
या योजनेसाठी आधार कार्ड लागणार आहे.
वय अधिवास प्रमाणपत्र ( हे प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र लागेल ).
अर्जदार महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिचा विवाह महाराष्ट्र राज्यात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत झाला असेल तर अशा प्रकरणांमध्ये सदर महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वय अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र ग्राह्य धरले जाणार आहे.
उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मात्र पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील महिलांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार नाही.
याशिवाय बँकेची डिटेल द्यावी लागणार आहे. अर्ज करताना बँकेचे पासबुक अपलोड करण्याची गरज नाही मात्र बँकेची डिटेल काळजीपूर्वक भरायची आहे.
कागदपत्र अपलोड करताना काय काळजी घ्यावी
अर्ज करताना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदान कार्डची फक्त एकच बाजू अपलोड केली तर अर्ज बाद होणार आहे. त्यामुळे आधार कार्ड चे दोन्ही बाजूचे फोटो काढून एकत्र जोडून मग हा फोटो अपलोड करायचा आहे. मतदान कार्ड संदर्भात देखील असेच करायचे आहे. तसेच रेशन कार्ड चे पहिल्या पानाचे आणि मागील पानाचे फोटो काढून एकत्र करून मग अपलोड करायचे आहे.