Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलावर्ग कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यात व्यस्त आहे. तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तहसील सोबतच शाळा, कॉलेजेस मध्ये देखील महिला शाळा सोडण्याचा दाखला काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली. राज्याच्या विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ महिलांना मिळणार आहे. दरम्यान या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ऑगस्ट अखेरपर्यंत पात्र महिलांना अर्ज सादर करता येणार आहे. या योजनेला महिलांचा खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु महिलांची आर्थिक लूटही सुरू आहे. अर्ज भरताना महिलांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
दरम्यान हीच आर्थिक पिळवणूक लक्षात घेता आता या योजनेसाठी अर्ज करणे हेतू नवीन अधिकृत एप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे. म्हणजे आता महिलांना या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी आता महिलांना कुठेच धावपळ करावी लागणार नाही. साहजिकच यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणतं आहे हे अँप्लिकेशन
आम्ही ज्या ॲप्लिकेशन बाबत बोलत आहोत ते आहे नारीशक्ती दूत. खरे तर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर लगेचच हे ॲप्लिकेशन सुरू केले जाणार होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे योजनेच्या अंमलबजावणी वेळी हे ॲप्लिकेशन सुरू झाले नाही. आता मात्र या एप्लीकेशन मध्ये असणारे तांत्रिक बिघाड दूर करण्यात आले असून हे ॲप्लिकेशन सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात हे ॲप्लिकेशन अपडेट केले जाईल आणि मग महिलांना या एप्लीकेशन वरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे.
अँप कसं वापरणार?
या अँप्लिकेशनमधून अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर मधून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. एप्लीकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. एप्लीकेशन ओपन झाले की तुम्हाला यामध्ये लॉगिन करायचे आहे. लॉगिन करण्यासाठी ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
accept terms and condition यावर टिक करा आणि स्वीकारा हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट करायचा आहे. मग व्हेरिफाय ओटीपी यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करा असा मेसेज दिसेल. मग तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
मग तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे. जसे की तुमचे संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा, नारीशक्तीचा प्रकार इत्यादी माहिती भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला प्रोफाइल अपडेट करावी लागणार. मग तुम्हाला नारीशक्ती दूत यावर क्लिक करायचे आहे. मग तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवर प्रेस करायचे आहे.
यानंतर मग तुम्हाला या योजनेचा सविस्तर अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्या महिलेची संपूर्ण माहिती भरायची आहे. यानंतर तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला/ रेशन कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे.
मग खाली जतन करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून घ्या. मग अर्ज दाखल करा या ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या जागेत टाका आणि यानंतर तुमचा अर्ज सादर करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकता.