Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली होती. सध्या या योजनेचे फॉर्म भरणे सुरू आहे. एक जुलैपासून या योजनेसाठी फॉर्म भरायला सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत.
या योजनेला राज्यातील महिलांच्या माध्यमातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिलांना लाभ मिळणार आहे. कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील या योजनेसाठी फॉर्म भरू शकते.
या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत. म्हणजे एका वर्षात तब्बल 18 हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे.
याचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना मिळणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलाचं यासाठी पात्र राहणार आहेत.
या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या काही कागदपत्रांमध्ये आता सूट देण्यात आली आहे. जसे की ज्या महिलांकडे वय अधिवास दाखला नसेल अशा महिलांना पंधरा वर्षांपूर्वीची रेशन कार्ड, मतदान कार्ड, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या चार पैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करता येणार आहे.
ज्या महिलांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला देखील द्यावा लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे पैसे थेट महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. याचे पैसे ऑगस्ट महिन्यात येणार आहेत.
दरम्यान आता ऑगस्ट महिन्याच्या कोणत्या तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार या संदर्भात माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्टला या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील. जुलै महिन्याचे देखील पैसे महिलांना दिले जाणार आहेत. अर्थातच या योजनेचा लाभ हा जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे.
ऑगस्ट नंतर पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. म्हणजेच सर्वसामान्य गरीब महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत दर महिन्याच्या 15 तारखेला पगार मिळणार आहे. पहिला पगार हा 15 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यात जमा होईल.