Mumbai Coastal Road Project : गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबईत विविध रस्ते विकासाची प्रकल्प पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आहे. मुंबईमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी एकीकडे सरकारच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. दुसरीकडे असे काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प पूर्ण होत आहेत ज्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवरील भार कमी होत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या आर्थिक राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू विकसित झाला आहे. या सागरी सेतूचे अटल सेतू असे नामकरण करण्यात आले आहे. शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित झालेल्या या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास वेगवान झाला आहे.
अशातच आज अर्थातच 11 मार्च 2024 रोजी मुंबईकरांसाठी आणखी एक नवीन रस्ते प्रकल्प सुरू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाले आहे.
वरळी ते मरीन ड्राईव्ह असा हा कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा 10.58 किलोमीटर लांबीचा आहे. याचे आज लोकार्पण पूर्ण झालं असून उद्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. मात्र या प्रकल्पाचा 9.5 किलोमीटर लांबीचा भागच फक्त वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.
उर्वरित एक किलोमीटर लांबीचा मार्ग अजूनही वाहतुकीसाठी सुरू होणार नाही. कारण की या प्रकल्पाचे काही काम अजूनही बाकी आहे. परिणामी हे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी हा मार्ग सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत सुरू राहणार आहे. उर्वरित कालावधीत या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
40 मिनिटाचा प्रवास फक्त 10 मिनिटात
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास गतिमान होणार आहे. मुंबईकरांना सध्या स्थितीला या प्रवासासाठी 35 ते 40 मिनिटांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. आता मात्र हा प्रवास फक्त दहा मिनिटात पूर्ण होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प 12 हजार 721 कोटी रुपयांचा असून याचे काम 2018 मध्ये सुरू झाले होते.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा प्रकल्प केव्हा सुरू होणार हा मोठा सवाल मुंबईकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. आता मात्र मुंबई कोस्टल रोड चा काही भाग उद्यापासून वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. उर्वरित भाग देखील लवकरच वाहतुकीसाठी सुरू होईल अशी आशा आहे.
टोल भरावा लागणार का ?
मुंबईकरांच्या माध्यमातून कोस्टल रोडने प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मुंबई कोस्टल रोडने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना कोणताच टोल द्यावा लागणार नाही. म्हणजेच या रस्त्याने मुंबईकरांना मोफत प्रवास करता येणार आहे. यामुळे मुंबईमधील प्रवाशांचा प्रवास जलद होईल आणि शहरातील काही भागांमधील वाहतूक कोंडी फुटेल असा अंदाज आहे.
कोणत्या वाहनांना राहणार बंदी ?
मिळालेल्या माहितीनुसार, उद्यापासून सुरू होणाऱ्या या मार्गावर काही वाहनांना बंदी राहणार आहे. बेस्ट आणि एसटी बसेस वगळता सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि सर्व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना या मार्गाने प्रवास करता येणार नाही.
सर्व प्रकारच्या दुचाकी, सायकल आणि अपंग व्यक्तींच्या मोटरसायकल आणि स्कूटर (साइडकारसह), सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, बैलगाड्या, टांगा आणि हातगाड्या यांना देखील या मार्गावर वाहतुकीची परवानगी राहणार नाही. पायी चालणाऱ्यांना देखील या मार्गाने प्रवास करता येणार नाही.