Mumbai Coastal Road : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही विकास कामांचे प्रकल्प पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्पांचे अजूनही काम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईकरांना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच अटल सेतू या देशातील सर्वाधिक लांबीच्या सागरी सेतूची भेट मिळाली आहे.
यामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद झाला आहे. अटल सेतूचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्याने आता मुंबई कोस्टल रोड प्रकल्प केव्हा सुरु होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान याच प्रकल्पाच्या लोकार्पणा संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरेतर छत्रपती शिवप्रभुंच्या जयंती दिनानिमित्त अर्थातच 19 फेब्रुवारीला या प्रकल्पाचे लोकार्पण करणे प्रस्तावित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा पहिला टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू केला जाणार होता. मात्र या प्रकल्पाचे लोकार्पण आता नियोजित वेळेत होणार नसल्याचे चित्र तयार झाले आहे.
पहिल्या टप्प्यात कोस्टल रोडची एक मार्गीका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. पण या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पणाचा मुहूर्त चुकला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून वेळ मिळाली नसल्याने हे लोकार्पण आता रखडणार असे चित्र आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की फेब्रुवारीच्या सुरुवातीला मुंबई पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या १०.५८ किमीच्या एकूण मार्गाचे सध्या ८५ टक्के काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी होणार अशी घोषणा केली होती.
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू झाला की प्रवाशांना वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे.
आता मात्र या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी केव्हा मुहूर्त मिळणार हे सांगणे थोडे कठीण आहे.
दरम्यान, प्रकल्पाचे आत्तापर्यंत 85 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जलद गतीने सुरू आहे. यामुळे मे 2024 पर्यंत हा संपूर्ण प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.