Mumbai Goa Expressway : मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई गोवा महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. खरंतर मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मात्र तरीही या मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पण आता या मार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी नागरिकांसाठी खुली करण्याचे टारगेट सरकारने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी हा महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट 2023 ते 28 सप्टेंबर 2023 या एका महिन्याच्या काळासाठी हा मार्ग अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. गणेशोत्सवापूर्वी एक लेन सुरू व्हावी यासाठी सध्या या मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. परंतु अवजड वाहनांमुळे या मार्गाचे काम करताना थोड्या अडचणी येत आहेत.
अशा परिस्थितीत हा मार्ग तब्बल एका महिन्यासाठी अवजड वाहनांसाठी बंद केला जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की काल 26 ऑगस्ट रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मार्गाच्या कामाची पाहणी केली आहे.त्यांनी रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते इंदापूर यादरम्यानच्या मार्गाची पाहणी केली.
ही पाहणी केल्यानंतर त्यांनी रस्त्याचे काम अधिक वेगाने व्हावे आणि गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची एक लेन नागरिकांसाठी सुरू व्हावी यासाठी या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक तब्बल एका महिन्याच्या काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी आज सायंकाळी अर्थातच 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेपासून होणार आहे.
याबाबतचा आदेश प्रशासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान या कालावधीत अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता अवजड वाहनांना या महामार्गाला पर्याय असलेल्या खालापूर या पर्यायी रस्त्यावरून वाहतूक करावी लागणार आहे.
एकंदरीत या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू व्हावी यासाठी राज्य सरकारने कंबर कसली असून या पार्श्वभूमीवर पळस्पे ते वाकण फाटा दरम्यान एका महिन्याच्या काळासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे आता या मार्गाची एक लेन लवकरच नागरिकांसाठी सुरू होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.