Mumbai Goa Vande Bharat Express : गेल्या वर्षी सुरु झालेली मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, 2019 मध्ये सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील एक हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली आहे. यातील सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या सात मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
अर्थातच देशाच्या आर्थिक राजधानीला आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीला आतापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
विशेष म्हणजे या पाचही वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व प्रतिसाद दाखवला जात आहे.
अशातच मात्र मुंबई ते गोवा दरम्यान सुरू असलेली अर्थातच मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी घडामोड समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी मंगळूरूपर्यंत विस्तारण्याचा घाट घातला जात आहे. खरेतर अलीकडेच मंगळूर ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. मात्र या वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीये.
यामुळे ही गाडी बंद करून त्याऐवजी मुंबई सेंट्रल ते मडगाव दरम्यान सुरू असलेली गाडी थेट मंगळूरूपर्यंत घेऊन जाण्याचा घाट रेल्वे प्रशासन आखत असल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत.
प्रसारमाध्यमांमध्ये रेल्वे प्रशासन लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला कोकणातील रेल्वे प्रवाशांनी कडाडून विरोध दाखवला आहे.
या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. रेल्वे प्रवाशांनी मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी मंगळूर पर्यंत घेऊन जाण्याऐवजी मंगळुरू ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी मुंबई सेंट्रल पर्यंत चालवली गेली पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले आहे.
यामुळे आता रेल्वे प्रशासन या साऱ्या घडामोडीनंतर खरंच मुंबई ते मडगाव दरम्यान धावणारी गाडी मंगळूरूपर्यंत घेऊन जाते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.