Mumbai Havaman Vibhag : मार्च महिना आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मार्च महिन्याच्या सरते शेवटी मात्र तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील अकोला शहरात तापमान 42.8°c पर्यंत नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव मध्ये तापमान 42°c पर्यंत पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे.
एकंदरीत मार्च महिन्याच्या सरते शेवटी तापमानाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाढता उकाडा मात्र सर्वसामान्यांसाठी मोठा हानिकारक ठरत असून उष्माघाताची भीती आहे.
वाढत्या उष्णतेमुळे सर्वत्र हाहाकार पाहायला मिळतोय. नागरिक अक्षरशः घामाघूम होत आहेत. वाढत्या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. अशातच मात्र भारतीय हवामान विभागाने 29 ते 31 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे हवामान खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे मुंबई हवामान विभागाने नुकताच एक नवीन अंदाज जारी केला आहे.
मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार तासात उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज सकाळपासून उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण आहे.
विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव मध्ये आज सकाळी दहाच्या सुमारास अगदी किरकोळ स्वरूपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळाले.
मालेगाव ग्रामीणमध्ये मात्र हवामान ढगाळ होते परंतु पावसाची हजेरी पाहायला मिळाली नाही. दुसरीकडे, ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा जाणवत आहे.
अशातच आता नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ३ ते ४ तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन सुद्धा आयएमडी मुंबईने केले आहे.