Mumbai Jalna Vande Bharat Express : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रातून एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
एकंदरीत मुंबईला आतापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. विशेष म्हणजे 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई-जालना या नवीन वंदे भारत एक्सप्रेस चे देखील उद्घाटन होणार आहे.
अर्थातच, मुंबईला आता लवकरच पाचवी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसची गुरुवारी अर्थातच 28 डिसेंबर 2023 रोजी मारते जालना या मार्गावर यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली आहे.
या गाडीची ट्रायल रन यशस्वी झाली असल्याने आता या गाडीचा उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन दिवसात आता या गाडीचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर ही गाडी सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे धावणार आहे. यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही हाय स्पीड ट्रेन निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना जलद गतीने राजधानी मुंबईत पोहोचता येणार आहे. तसेच मुंबई फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मराठवाड्यातील पर्यटन स्थळांना देखील जलद गतीने पोहोचता येणार आहे.
यामुळे मराठवाड्यातील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. या गाडीचे 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले जाणार आहे.
दरम्यान या गाडीचे तिकीट दर काय राहणार हा मोठा सवाल नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. अद्याप या गाडीचे तिकीट दर काय राहणार याबाबत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण मीडिया रिपोर्टनुसार 900 ते 1200 रुपये असे संपूर्ण प्रवासाचे भाडे राहू शकते. म्हणजे मुंबई ते जालना प्रवास करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर बाराशे रुपयांपर्यंत राहणार असा दावा केला जात आहे.