Mumbai Jalna Vande Bharat Express : जालनासहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी आजचा दिवस खूपच खास राहणार आहे. कारण की, आज मराठवाड्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. मराठवाड्यातील जालना ते राजधानी मुंबई दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे.
छत्रपती संभाजीनगर मार्गे ही गाडी धावणार असून यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना जलद गतीने राजधानी मुंबईत पोहोचता येणार आहे. यामुळे मराठवाड्यातील नागरिकांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत पंतप्रधानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास कामांचे लोकार्पण केले जात आहे. आज पुनर्विकसित आयोध्या धाम जंक्शनचे Pm Modi यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
या कार्यक्रमातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस सहित एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. याशिवाय दोन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन देखील सुरू केल्या जाणार आहेत.
आज मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस फक्त उद्घाटनपर धावणार आहे. मात्र या गाडीची नियमित सेवा उद्यापासून अर्थातच नवीन वर्षातच सुरू होणार आहे. ही गाडी एक जानेवारी 2024 पासून नियमित धावणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि या गाडीला कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळू शकतो याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार संपूर्ण वेळापत्रक ?
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना जनशताब्दी एक्सप्रेस ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे. मात्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर सर्वात वेगवान गाडी ठरणार आहे.
आता ही गाडी उद्यापासून नियमितपणे धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरून सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार आहे आणि दुपारी 11 वाजून 55 मिनिटांनी ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तसेच मुंबई येथून ही गाडी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि जालना येथे रात्री 8:30 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी फक्त 7 तास आणि 20 मिनिटात आपला प्रवास पूर्ण करणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
ही गाडी छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, नासिक आणि ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर थांबणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर येत आहे.