Mumbai Metro News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढत आहे. वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. यामुळे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे.
विशेष म्हणजे या तिन्ही शहरातील काही भागात मेट्रो सुरू देखील झाली आहे. तसेच काही मार्गांवर मेट्रोचे काम सुरू आहे. मुंबई शहरासमवेतच उपनगरात देखील मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून म्हणजेच एम एम आर डी ए च्या माध्यमातून हे काम केले जात आहे. अशातच, आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विस्तारित मुंबई शहरात आणखी एक नवीन मेट्रो मार्ग विकसित करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
विशेष म्हणजे यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे लवकरच या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
या प्रकल्पाचे काम अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे. येत्या सात ते आठ महिन्यात या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. अशातच, आता मीरा-भाईंदर हुन आणखी एक मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मीरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मेट्रो मार्ग तेरा क्रमांकाचा मार्ग राहणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनची या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुद्धा सुरु झाले आहे. मीरा रोड ते विरार हा एकूण 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहील. यावर वीस स्थानके तयार केली जाणार आहेत. येत्या वर्षभरात या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षात पूर्ण होणार आहे. नक्कीच या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर ते वसई-विरार या दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे या परिसराचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.