Mumbai Metro News : मुंबई, नवी मुंबई शहरासह उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून मेट्रो चालवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवी मुंबई शहरातील नागरिकांना देखील मेट्रोची भेट मिळाली आहे. नवी मुंबईमध्ये जवळपास बारा वर्षांपूर्वी मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, हा मेट्रो मार्ग सुरू विविध कारणांमुळे नियोजित वेळेत सुरू करता आला नाही.
आता मात्र नवी मुंबई मधील मेट्रो सुरु झाली असून याला शहरातील नागरिकांच्या माध्यमातून विशेष प्रतिसाद देखील दाखवला जात आहे. बेलापूर ते पेंढार या मार्गावर गेल्या महिन्यात प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. या मार्गामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे एवढे नक्की.
तथापि, या 11 किलोमीटर लांबीच्या मार्गावर असलेले 11 स्थानकांपैकी पेंधार हे स्थानक तळोजा नोड मध्ये येते. पण या तळोजा नोड मधील पेंधार स्थानकाचा तळोजा एमआयडीसीत कामाला असलेल्या नागरिकांना काहीच फायदा होत नाही.
त्यामुळे एमआयडीसीतील उद्योजक आणि कामगारांच्या माध्यमातून आता एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. खरे तर या एमआयडीसीत मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर येथील लाखो कर्मचारी येतात.
मात्र सध्या स्थितीला या कर्मचाऱ्यांना आणि उद्योजकांना येथून घरी परतण्यासाठी आजही रस्ते मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. सिटी बस शिवाय आणि खाजगी वाहनाशिवाय या कर्मचाऱ्यांना आणि उद्योजकांना दुसरा पर्याय नाही.
यामुळे मेट्रो सुरु झालेली असतानाही तळोजा एमआयडीसीत काम करणाऱ्यांना मोठ्या तारेवरची कसरत करून रोजचा प्रवास पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे तळोजा एमआयडीसीत कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि उद्योजकांच्या माध्यमातून नवी मुंबई मेट्रोचा विस्तार केला गेला पाहिजे अशी मागणी पुढे आली आहे.
सध्या या मार्गावर 11 स्टेशन्स आहेत. म्हणून यामध्ये दोन स्टेशन्स 12 आणि 13 याची भर घालून हा मार्ग तळोजा एमआयडीसी पर्यंत विस्तारित करावा अशी मागणी आता उद्योगाने सिडकोकडे केली आहे.
तळोजा इंडस्ट्रियल असोसिएशनने यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून नुकतेच सिडको प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सिडकोने देखील याला सकारात्मक असा प्रतिसाद दाखवला आहे. त्यामुळे नवी मुंबई मधील हा मेट्रो मार्ग लवकरच विस्तारणार असा आशावाद व्यक्त होत आहे.