Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग उभारला जात आहे. हा महामार्ग दस्तूर खुद्द माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. यामुळे या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आत्तापर्यंत निम्म्याहून अधिक मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
या महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर एवढी आहे. यापैकी 600 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. यावर वाहतूक देखील सुरू करण्यात आली आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाचे आत्तापर्यंत नागपूर ते भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. सुरुवातीला नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा बांधण्यात आला.
या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर मग शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा मार्ग बांधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता भरवीर ते मुंबई पर्यंतचा टप्पा देखील लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. या उर्वरित मार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून डिसेंबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर मग हा राहिलेला भाग देखील सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
हा संपूर्ण मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला की मुंबई ते नागपूर हा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मात्र सध्या स्थितीला सुरू असलेल्या समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अपघातांची वाढलेली संख्या यामुळे समृद्धी महामार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. यामुळे सरकारची किरकिरी देखील होऊ लागली आहे. मात्र आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी शासनाकडून काही ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत.
आतापर्यंत शासनाने अपघात थांबवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र या उपायोजना करूनही अपघातांची संख्या कमी होत नाहीये. समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर खराब असल्यामुळे आणि महामार्ग संमोहन यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे आता हे अपघात थांबवण्यासाठी समृद्धी महामार्गावर दर पाच किलोमीटर नंतर रंबल पट्ट्या बसवल्या जाणार आहेत. सध्या समृद्धी महामार्गावर दर दहा किलोमीटर नंतर रंबल पट्टया आहेत.
पण आता प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरावर या पट्ट्या बसवल्या जाणार आहेत. याशिवाय वाहनचालकांना सतर्क करण्यासाठी कॅरेज वे वर शिल्पे उभारले जातील. याशिवाय महामार्गावर जागोजागी परावर्तित टेप आणि सोलर ब्लींकर बसवले जातील अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले जाणार आहेत. याशिवाय समृद्धी महामार्गावरील टोल प्लाजावर सावधगिरीचे संकेत, सार्वजनिक घोषणा यांसारख्या उपायोजना देखील केल्या जात आहेत. यामुळे समृद्धी महामार्गावरील अपघात बऱ्यापैकी कमी होतील असे मत व्यक्त केले जात आहे.