Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे समृद्धी महामार्ग संदर्भात. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवेश नियंत्रित महामार्ग तयार केला जात आहे. याला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जात आहे.
या समृद्धी महामार्गाचे आत्तापर्यंत तीन टप्पे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले आहेत. आता या महामार्गाचा चौथा टप्पा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार अशी माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला आणि सर्वात मोठा टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी दाखल झाला होता.
याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. यानंतर या महामार्गाचा 80 किलोमीटर लांबीचा अर्थात शिर्डी ते भरवीर हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये दाखल झाला.
तसेच या चालू वर्षाच्या सुरुवातीला भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. म्हणजेच सध्या स्थितीला 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला आहे.
विशेष बाब अशी की या महामार्गाचा बाकी राहिलेला टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. खरे तर आधी हा चौथा टप्पा जुलै अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असे म्हटले जात होते मात्र आता हा मुहूर्त लांबला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाचे इगतपुरी ते आमने या शेवटच्या टप्प्याचे एकूण 95% एवढे काम पूर्ण झाले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कसारा येथील उड्डाणपुलाचे काम वगळता उर्वरित काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
त्यामुळं ऑगस्टपासून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कसारा येथील उड्डाणपुलाची एक बाजू ऑगस्टपर्यंत तर दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र, डिसेंबरपर्यंत वाहतूक सेवा थांबवता येणार नाही.
त्यामुळं पुलाच्या ज्या एक बाजूचे काम होईल ती बाजू ऑगस्ट अखेरपर्यंत सुरू केली जाणार आहे. त्याबाजूने दुसरी वाहतूक सुरू करुन हा टप्पा खुला करता येऊ शकतो. एकदा का समृद्धी महामार्ग खुला झाला तर मुंबई ते नागपूर हे अंतर 8 तासांत पूर्ण करता येणार आहे.