Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील दहा जिल्ह्यांमधून जात आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण हे चारही विभाग परस्परांना जोडले जाणार आहेत.
या मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना जलद गतीने राजधानीत पोहोचता येणार आहे. परिणामी, राज्याचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार असून हा मार्ग राज्याच्या वैभवात भर घालणार आहे. सध्या या मार्गाचा 600 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला. यानंतर या चालू वर्षात या मार्गाचा शिर्डी ते इगतपुरीमधील भरवीर यादरम्यानचा 80 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
म्हणजेच आतापर्यंत या मार्गाचा सहाशे किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला असून उर्वरित 101 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र भरवीर ते मुंबई पर्यंतचा मार्ग केव्हा सुरू होणार हा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार केला जात असलेला हा समृद्धी महामार्ग लवकरच सर्वसामान्यांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या संपूर्ण मार्गाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग हा 6-लेन प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे असून यासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. खरंतर या मार्गाची घोषणा 2015 मध्ये वर्तमान उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
हा मार्ग देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे या मार्गाची घोषणा झाल्यानंतर तीन वर्षांनी या मार्गाची पायाभरणी करण्यात आली. 2018 मध्ये या मार्गाचे काम सुरू झाले. काम सुरू केल्यानंतर अवघ्या चार वर्षांच्या काळात 520 किलोमीटर लांबीचा मार्ग बांधून सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला.
यानंतर काही महिन्यातच या मार्गाचा 80 किलोमीटर चा भाग वाहतुकीसाठी सुरू झाला. आता उर्वरित 101 किलोमीटर चा भाग नवीन वर्षात अर्थातच 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग नवीन वर्षात सुरू होणार अशी शक्यता आहे. यामुळे हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना शिर्डी आणि शनिशिंगणापूरला जाणे सोपे होणार आहे. यामुळे शिर्डी येथील साईबाबांचे आणि शनिशिंगणापूर येथील शनि देवांचे दर्शन भाविकांना सुलभतेने घेता येणार आहे.