Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मायानगरी मुंबईमध्ये राहणे कोणाला आवडत नाही. मुंबई ही भारताच्या आर्थिक वैभवाचे प्रतीक आहे. यामुळे मायानगरी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. अलीकडे मात्र राजधानी मुंबईत मोकळा श्वास घेणे फारच अवघड होऊ लागले आहे.
वाढती लोकसंख्या आणि परिणाम स्वरूप वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे राजधानी मुंबईतल्या प्रदूषणाचा स्तर हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील मोठी जटील बनली आहे.
दरम्यान याच साऱ्यांवर उतारा म्हणून आता राजधानी मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून लोकांनी अधिका अधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुंबई शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबईकरांना मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची भेट मिळाली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थातच अटल सेतूमुळे आता मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित झाला आहे. दरम्यान अटल सेतू नंतर आता मुंबईकरांना आणखी एका सागरी सेतूची भेट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील वाहतूक व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडून पुढे 17 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू विकसित होणार आहे. वांद्रे ते वर्सोवा दरम्यान हा सी-ब्रिज तयार होणार असून याचे काम आता सुरू झाले आहे.
या प्रकल्पाच्या आराखड्यानुसार आता समुद्रात पायलिंग आणि पाया भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे मुंबईच्या वैभवात येत्या काही वर्षात आणखी भर पडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपली मुंबई आणखी निरखून निघणार आहे.
या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पूर्ण केले जाणार आहे. यासाठी 11 हजार 333 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत आठ मार्गिका असलेला सागरी सेतू विकसित होणार आहे. या पुलाची रुंदी 28 मीटर एवढी राहणार आहे.
ॲप्को इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून हा सागरी सेतू विकसित होणार आहे. या प्रकल्पाचे काम एकूण पाच टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यानुसार या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून आगामी तीन वर्षात हा प्रकल्प पूर्णपणे रेडी होईल अशी आशा आहे.
एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारण्यासाठी आवश्यक असलेले पायलिंग आणि पायाचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर लवकरच पुढील काम हाती घेतले जाणार आहे. मग तेथून पुढे खऱ्या अर्थाने पुलाचे बांधकाम दिसू लागेल. म्हणजे येत्या काही महिन्यांनी या सागरी सेतूचे काम आकार घेणार आहे.