Mumbai News : राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांची कामे नजिकच्या भविष्यात सुरू होणार आहेत तर काही प्रकल्पांचे काम नुकतेच सुरू झाले आहे. मुंबई आणि मुंबई महानगरक्षेत्रातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम असलेल्या अशाच एका प्रकल्पाचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून ईस्टर्न फ्री – वे थेट कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी मधून अवघ्या वीस मिनिटांच्या कालावधीत मुंबईला पोहोचता येणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान एक कॉरिडोर तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे भू तांत्रिक तपासणीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे.
हा प्रकल्प 9.23 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यासाठी 35 ठिकाणी भू तांत्रिक तपासणी होणार आहे. विशेष म्हणजे यापैकी सात ठिकाणी हे काम पूर्ण देखील झाले आहे.
या तपासणीमुळे जमिनीच्या पृष्ठभागापासून किती खाली खडक आहे, पाण्याची पातळी काय आहे, माती कशी आहे, पायासाठी किती खोल खोदावे लागणार इत्यादी बाबी समजणार आहेत. म्हणजेच या तपासणीचे काम या प्रकल्पाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे.
हे काम या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. दरम्यान या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली असल्याने नजीकच्या काळात या प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होऊ शकणार आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पावसाळा संपताचं सुरू होण्याची शक्यता आहे.
या 9.23 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी जवळपास 6.23 किलोमीटर लांबीचा मार्ग अंडरग्राउंड म्हणजेच भूमिगत राहणार आहे. हा कॉरिडॉर पी. डी’मेलो रोडवर असलेल्या ऑरेंज गेटपासून मरीन ड्राइव्हजवळ बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडपर्यंत असणार आहे.
या प्रकल्पासाठी 7765 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांतर्गत ६.५१ किलोमीटर लांबीचा बोगदा विकसित होणार आहे. या बोगद्यात वाहतुकीसाठी दोन्ही दिशेने दोन-दोन लेन राहणार आहेत.
तसेच इमर्जन्सी साठी एक स्पेशल लेन राहणार आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी, चेंबूर या दिशेकडून दक्षिण मुंबई तसेच उपनगरात येणाऱ्या वाहनांना या प्रकल्पामुळे सिग्नल मुक्त प्रवास करता येणार आहे.
त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. हा प्रकल्प शहरातील वाहतुकीला चालना देईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.