Mumbai News : तुम्हीही मुंबई ते पुणे किंवा पुणे ते मुंबई असा दररोज प्रवास करता का ? मग आजची बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. खरेतर, मुंबईला महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून दर्जा मिळालेला आहे. विशेष म्हणजे मुंबई ते पुणे प्रवास हा एक्सप्रेस वे विकसित झाल्यापासून थोडासा गतिमान देखील झाला आहे.
शिवाय अलीकडेच विकसित झालेल्या अटल सेतूमुळे अर्थातच शिवडी ते न्हावा शेवा दरम्यानच्या सागरी सेतूमुळे या प्रवासाला अजून वेग मिळाला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू हा भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू म्हणून ओळखला जातो.
या प्रकल्पाचे लोकार्पण या नवीन वर्षातच झाले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास जलद होत आहे. साहजिकच यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील सुपरफास्ट होत आहे.
पण अजूनही अटल सेतूपासून पुढे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर जातांना प्रवाशांना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागतोय.
आता मात्र प्रवाशांची ही अडचण लवकरच दूर होणार आहे. कारण की, अटल सेतूच्या पुढील टप्प्याच्या बांधकामाला देखील नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतूच्या चिर्ले येथील जोडणी पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी प्राप्त झाली आहे. परिणामी आता अटल सेतूचा हा पुढील भाग जेव्हा पूर्णपणे रेडी होईल तेव्हा मुंबई- पुण्यातील अंतर आणखी कमी होणार अशी आशा आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होऊ शकणार आहे. विशेष बाब अशी की, या जोडणी पुलाच्या बांधकामासाठी 10 अब्ज रुपयांचा खर्च होण्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तसेच या प्रकल्पाचे काम जेव्हा सुरू होईल तेव्हा हा प्रकल्प विक्रमी 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदर कंत्राटदाराला दिली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दक्षिण मुंबईतील शिवडी आणि वरळी उन्नत मार्गाच्या जोडणी पुलाचे काम सुरू केलेल आहे.
यामुळे भविष्यात मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून मुंबईहून पुणे आणि पुण्याहून मुंबई हा प्रवास खूपच सोयीचा होणार अशी आशा व्यक्त होत आहे.