Mumbai News : सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नासिक, नागपूर यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये विविध प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही प्रकल्प पूर्ण झाली आहेत तर काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. मुंबई, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरात मेट्रोची कामे देखील केली जात आहेत. दरम्यान नवी मुंबई शहरातील पहिल्या मेट्रोमार्ग संदर्भात नुकतेच एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
खरे तर नवी मुंबई शहरात सिडकोच्या माध्यमातून बेलापूर ते पेंधार दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरू देखील झाला आहे. मात्र नवी मुंबई शहरातील प्रवाशांची अडचण पाहता हा मेट्रो मार्ग उद्घाटनाविनाच सुरू करण्यात आला आहे.
म्हणजेच या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन अजूनही झालेले नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आता या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे. विशेष म्हणजे याचे उद्घाटन दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्गाचे उद्घाटन 12 जानेवारी 2024 ला होण्याची दाट शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 जानेवारीला नवी मुंबई दौरा राहणार आहे. यावेळी नवी मुंबई शहरातील विविध प्रकल्पांचे लोकार्पण माननीय पंतप्रधानांच्या हस्ते पूर्ण होणार आहे. यावेळी अटल सेतू अर्थातच शिवडी ते न्हावा शेवादरम्यान विकसित होणारा सागरी ब्रिजचे सुद्धा उद्घाटन केले जाणार आहे.
हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई शहरासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त वीस ते पंचवीस मिनिटात पूर्ण होणार आहे. एवढेच नाही तर या सागरी सेतूमुळे मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 90 मिनिटात पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.
या सागरी मार्गाने प्रवास करण्यासाठी मात्र अडीचशे रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. दरम्यान हा प्रकल्प आता 12 जानेवारीला सुरू होणार असल्याने मुंबई आणि नवी मुंबई शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
बेलापूर ते पेंढार मेट्रो मार्ग
हा मार्ग गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाला आहे. नवी मुंबई शहरातील मेट्रो तयार झालेली असतानाही फक्त उद्घाटन विना शहरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. हेच कारण होते की त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन न करता हा मार्ग ताबडतोब सर्वसामान्यांसाठी सुरू करावा असे निर्देश दिले होते. याच निर्देशानुसार हा मेट्रो मार्ग नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झाला. आता याच मेट्रो मार्गाचे 12 जानेवारीला औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे.
खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचाही शुभारंभ
12 जानेवारीला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि बेलापूर ते पेंधार मेट्रो मार्गाचे औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे. यापैकी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे उद्घाटन 25 डिसेंबर 2023 ला नियोजित करण्यात आले होते. मात्र प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही यामुळे याचे आता 12 जानेवारीला उद्घाटन होणार आहे.
याशिवाय नेरूळ खारकोपर उरण या रेल्वे मार्गाचा खारकोपर ते उरण हा दुसरा टप्पा देखील 12 जानेवारीला सुरू होणार आहे. याचे उद्घाटन देखील पंतप्रधान करणार आहेत. यामुळे उरण शहरातील नागरिकांना थेट लोकांनी सीएसएमटी पर्यंत प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
परिणामी शहरातील एकात्मिक विकास सुनिश्चित होणार असून जलद दळणवळण व्यवस्था लाभणार आहे. यावेळी मुंबई महानगर प्रदेशातील विविध विकास कामांचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित आहे. यामुळे पंतप्रधानांचा नवी मुंबई दौरा खूपच खास ठरणार आहे.