Mumbai News : मुंबई, ठाणे, नवी मुंबई सह उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. खरेतर, मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
शहरात अन उपनगरात अनेक उड्डाणपूल, भुयारी मार्ग, कोस्टल रोड, बोगदा, सागरी सेतू असे रस्ते विकासाचे काम केले जात आहे. अशातच, आता ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
ठाण्यातील कोलशेत ते भिवंडी येथील काल्हेरदरम्यानची मिसिंग लिंक जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोलशेत ते काल्हेर खाडीपूल प्रकल्पाबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा खाडी पूल विकसित केला जाणार आहे. या पुलामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित होणार आहे.
दरम्यान याच पुलासाठी एमएमआरडीएने म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने निविदा जारी केली असल्याची माहिती एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
या मार्गाच्या कामासाठी आता निविदा जारी झाली असल्याने यातून हा खाडी पूल उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल आणि या खाडी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
कसा आहे हा प्रकल्प
मिळालेल्या माहितीनुसार एमएमआरडीएकडून या खाडीवर ६१० मीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकल्पांतर्गत १.६४ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होणार आहे.
त्यासाठी २७४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.ठाण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. काल्हेर गाव हे जुना आग्रा रस्त्याशी जोडलेले असून या भागात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.
या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आणि कोलशेत ते काल्हेर हे अंतर जवळ आणण्यासाठी नव्या खाडीपुलाची उभारणी केली जात आहे.
हा प्रस्तावित मार्ग विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोरशी आणि ठाणे सागरी किनारा मार्गाशी जोडला जाणार आहे. यातून जुना आग्रा रस्त्यावरील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होईल अशी आशा व्यक्त होत आहे.