Mumbai Pune Railway News : उन्हाळा लागला की मुंबई, पुण्यामधून मोठ्या प्रमाणात पब्लिक आपल्या मूळ गावाकडे निघते. यंदाही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जनता आपल्या गावी जात आहे. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणूकीचे मतदान देखील सुरू आहे. यामुळे अनेकजण मतदानासाठी देखील आपल्या गावाकडे परतत आहेत.
अशा परिस्थितीत, सध्या विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रेल्वे गाड्या हाउसफुल धावत आहेत. यामुळे मात्र प्रवाशांची मोठी कोंडी होत असून हीच कोंडी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबईमधून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही उन्हाळी विशेष ट्रेन मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडली जाणार आहे.
एलटीटी ते भुवनेश्वर दरम्यान ही समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार असून यामुळे मुंबई, ठाणे, लोणावळा, पुण्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे नेमके वेळापत्रक कसे आहे? ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ? या संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समर स्पेशल ट्रेनच्या एलटीटी ते भुवनेश्वर अशा दोन आणि भुवनेश्वर ते एलटीटी अशा दोन अशा एकूण चार विशेष फेऱ्या होणार आहेत. एलटीटी-भुवनेश्वर विशेष एक्सप्रेस ट्रेन ( गाडी क्रमांक ०८४१९ ) १० आणि १७ मे ला लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सोडली जाणार आहे.
हे दोन दिवस ही गाडी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी भुवनेश्वर येथे पोहोचणार आहे.
तसेच भुवनेश्वर-एलटीटी विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक ०८४२०) ८ मे आणि १५ मे ला चालवली जाणार आहे. हे दोन दिवस ही गाडी भुवनेश्वर येथून रात्री ११ वाजता सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता मुंबईला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही गाडी महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर या सात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.