Mumbai Railway News : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रेल्वे वाहतूक सुधारावी यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन रुळावर धावत आहे. ही ट्रेन १६० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातो.
दुसरीकडे आता यापेक्षा दुप्पट वेग असलेली बुलेट ट्रेन देखील लवकरच सुरू होणार आहे. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडतो.
मुंबई ते अहमदाबाद यादरम्यान बुलेट ट्रेन प्रोजेक्टचे काम सुरु आहे. दरम्यान याच प्रकल्पात आता एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे.
ती म्हणजे राज्यातील पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन चा मार्ग तयार होत आहे.
याच बुलेट ट्रेन प्रकल्प अंतर्गत पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये कामाला सुरुवात झाली असून हे काम शिळफाटा ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत विस्तारणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज-C3 चा भाग म्हणून केले जाणार आहे.
हा जवळपास 135 किलोमीटर लांबीचा टप्पा राहणार आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी खांब उभारणी केली जात आहे. तसेच दोन पर्वतीय बोगद्यांचे देखील काम केले जात आहे. या सेक्शनमध्ये ठाणे, बोईसर आणि विरार अशी तीन स्थानके राहणार आहेत.
या प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेकडे आहे. या प्रकल्पांतर्गत देशातील समुद्राखालील पहिल्या बोगद्याचं सुद्धा काम केल जाणार आहे. सध्या याचे बांधकाम सुरु आहे.
या बोगद्याची लांबी 21 किमी एवढी राहणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथे भूमिगत स्थानकांदरम्यान हे काम केले जात आहे. बुलेट ट्रेन प्रोजेक्टमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास जलद होणार आहे.
अवघ्या दोन तासात या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास केला जाऊ शकतो. या मार्गावर ताशी 320 किलोमीटर या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे. संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
हा केंद्रातील सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2026 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्याची शक्यता आहे. अर्थातच 2026 मध्ये बुलेट ट्रेन रुळावर धावणार आहे.