Mumbai Railway News : मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे आनंदाचे अपडेट समोर आले आहे. खरंतर राजधानी मुंबई येथून करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी श्रीक्षेत्र कोल्हापूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
शिवाय कोल्हापूर येथून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या देखील खूपच अधिक आहे. यामुळे या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
मात्र असे असले तरी या रेल्वे मार्गावर खूपच कमी प्रमाणात गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान, भारतीय रेल्वे कडून या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाईल अशी बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील या मार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे संकेत दिले होते.
मात्र या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस केव्हा सुरू होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते कोल्हापूर अशी एकेरी विशेष ट्रेन चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
यामुळे मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान आज आपण या एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
ही एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर यादरम्यान चालवली जाईल. ही गाडी येत्या 3 दिवसात अर्थातच २० फेब्रुवारीला सोडली जाणार आहे.
या दिवशी ही गाडी मध्यरात्री ००.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणार आणि त्याच दिवशी ११.३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचणार आहे.
कुठं मिळणार थांबा
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, या एकेरी विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणाराही.
दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबेल अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे.