Mumbai Railway News : सध्या उन्हाळी सुट्टी सुरु आहे आणि उष्णता देखील प्रचंड वाढली आहे. तापमानाचा पारा 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. मात्र, कडक उन्हाच्या झळा बसत असल्या तरी उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्याने अनेकजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. काहीजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत.
विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या असल्याने अनेकांनी उन्हाळी सहलीचे नियोजन केले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्या रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे विभागाने देखील उन्हाळी विशेष गाड्या चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशातच सेंट्रल रेल्वेने मुंबईहून आणखी एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मुंबई ते नागपूर अशी वनवे विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.
पण ही गाडी फक्त मुंबईहून नागपूरलाच जाणार आहे. विशेष म्हणजे या वनवे उन्हाळी विशेष एक्सप्रेस ट्रेनचे आज पासून अर्थातच एक मे 2024 पासून आरक्षण देखील सुरू होणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक
ही एकेरी विशेष गाडी उद्यापासून अर्थातच दोन मे 2024 पासून रुळावर धावणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १२.२० वाजता सुटणार आहे आणि १५ तासानंतर दुपारी ३.३२ वाजता नागपूर स्थानकात पोहचणार आहे. यामुळे मुंबईहून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कामानिमित्त आणि शिक्षणानिमित्त विदर्भातील जनता हजारोंच्या संख्येने मुंबईत वास्तव्याला आहे. यामुळे दरवर्षी उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की ही मंडळी आपल्या मूळ गावी परतत असते. यावर्षी देखील मुंबई मधून विदर्भाला जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
कुठे घेणार थांबा
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी विशेष गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.