Mumbai Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क देशातील प्रत्येक शहरांमध्ये पोहोचलेले आहे. यामुळे रेल्वे प्रवासाला विशेष पसंती दाखवली जाते.
दरम्यान मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. खरे तर मनमाड ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला नोकरदार महिलांसाठी आरक्षित डब्बा ठेवण्यात आला आहे.
पण, मुंबई ते मनमाड अशा डाऊन मार्गावर धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला नोकरदार महिलांसाठी आरक्षित डब्बा नव्हता. यामुळे मुंबईमधून मनमाडकडे जाणाऱ्या नोकरदार महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
यामुळे डाऊन मार्गावर धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला नोकरदार महिलांसाठी आरक्षित डब्बा असावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली होती.
या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. प्रवासी संघटनेच्या माध्यमातून याकरिता रेल्वे बोर्डाकडे सातत्याने मागणी केली जात होती.
दरम्यान हा सारा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून रेल्वे बोर्डाने मुंबई ते मनमाड अशा धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससाठी देखील नोकरदार महिलांकरिता आरक्षित डब्बा मंजूर केला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मुंबईहून मनमाडकडे धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचा 19 वा डब्बा हा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे. या मार्गावर दररोज 1,000 प्रवासी प्रवास करतात.
यामध्ये 200 ते 250 महिलांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत, रेल्वे बोर्डाने घेतलेला हा मोठा निर्णय या तमाम नोकरदार महिलांसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे.
आता मुंबईहून मनमाडकडे जाताना पंचवटी एक्सप्रेस मध्ये 19 वा डब्बा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे तर मनमाडहून मुंबईकडे जाताना महिलांसाठी चौथा डब्बा आरक्षित राहणार आहे.
यामुळे या मार्गावरील महिला रेल्वे प्रवाशांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाचे महिला रेल्वे प्रवाशांनी स्वागत केलेले आहे.