Mumbai Solapur Vande Bharat Express : मुंबई ते सोलापूर दरम्यानचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने फेब्रुवारी 2023 मध्ये या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली आहे. या मार्गावर सुरू झालेली ही हाय स्पीड ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे.
ही ट्रेन पुणे मार्गे धावत असल्याने पुणेकरांचा मुंबईकडील प्रवास आणखी गतिमान झाला असून सोलापूरकरांना देखील मुंबई आणि पुण्याकडील प्रवास जलद गतीने पूर्ण करता येत आहे. खरंतर, ही गाडी प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. दरम्यान आता ही गाडी कलबुर्गी पर्यंत धावणार असल्याचे सांगितले जात आहे.
मार्च महिन्यात कलबुर्गीचे खासदार डॉक्टर उमेश जाधव यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला याबाबतची माहिती दिली होती. तेव्हापासूनच या मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस खरंच कलबुर्गी पर्यंत धावणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कलबुर्गीचे खासदार जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस कलबुर्गी पर्यंत धावावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.
या भेटीत त्यांनी ही गाडी कलबुर्गीपर्यंत चालवली पाहिजे अशी विनंती रेल्वेमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी यास तत्त्वतः मान्यता दिली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. खरंतर सध्या ही गाडी 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे. मात्र लवकरच या गाडीचा वेग 130 किलोमीटर प्रति तास एवढा बनणार आहे.
या गाडीचा वेग वाढला की मग ही गाडी सोलापूर पर्यंत चालवण्याऐवजी थेट कलबुर्गी पर्यंत चालवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मात्र आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही गाडी सव्वाचार वाजता सोलापूरच्या दिशेने रवाना होते आणि रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचते.
ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर रात्री मुक्कामी राहते आणि मग सकाळी 6 वाजून पाच मिनिटांनी सोलापूर येथून मुंबईकडे रवाना होते आणि दुपारी साडेबारा वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते. अशा परिस्थितीत ही गाडी रात्री सोलापूरला मुक्कामाला ठेवण्याऐवजी थेट कलबुर्गी पर्यंत धावली पाहिजे अशी मागणी कलबुर्गीचे खासदार महोदय यांनी केली आहे.
विशेष म्हणजे खासदार महोदय यांच्या या मागणीला रेल्वे मंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दाखवला आहे. मात्र ही गाडी कलबुर्गीपर्यंत केव्हा धावणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही.