Mumbai-Solapur Vande Bharat Train : फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबई ते सोलापूर या रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन पुणे मार्गे धावत आहे. यामुळे पुणेकरांचा मुंबईकडील तसेच सोलापूरकडील प्रवास सोयीचा झाला आहे. तसेच सोलापूर वासियांचा पुणे आणि मुंबईकडील प्रवास गतिमान झाला आहे. यामुळे या ट्रेनला रेल्वे प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात ही ट्रेन सुरू झाली आणि मार्च महिन्यातच या ट्रेन संदर्भात एक मोठी माहिती हाती आली. कलबुर्गीचे खासदार डॉक्टर उमेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणारी ही वंदे भारत ट्रेन कलबुर्गी पर्यंत धावण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्राथमिक निर्णय घेतला असल्याची माहिती दिली होती.
खासदार महोदय यांनी त्यावेळी सांगितले होते की, त्यांनी ही ट्रेन कलबुर्गीपर्यंत धावावी यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे विनंती केली होती. या विनंतीला केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी मान्यता देखील दिल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. यामुळे ही ट्रेन आता कलबुर्गी पर्यंत केव्हा धावणार? हा प्रश्न कलबुर्गी वासीयांना पडला आहे.
केव्हा धावणार कलबुर्गी पर्यंत
खरंतर, ही गाडी मुंबईहून सव्वाचार वाजता सोलापूरच्या दिशेने रवाना होते आणि सोलापूरला रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पोहोचते. रात्री ही गाडी सोलापूरलाच मुक्काम राहते. मग दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सोलापूरहुन मुंबईकडे रवाना होते आणि दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचते.
अशा परिस्थितीत ही गाडी सोलापूरला मुक्कामला ठेवण्याऐवजी थेट कलबुर्गी पर्यंत चालवावी अशी मागणी खासदार महोदय यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. मात्र ही गाडी कलबुर्गीपर्यंत तेव्हाच धावणार जेव्हा या गाडीचा वेग वाढेल. सध्या ही गाडी 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावत आहे.
रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन झाल्यानंतर मात्र या गाडीचा वेग वाढणार आहे. ही गाडी जवळपास 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणार आहे. यासाठी मात्र आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज आहे. यामुळे येत्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ही गाडी कलबुर्गीपर्यंत धावेल असे चित्र तयार होत आहे.