Mumbai To Goa Travel : राजधानी मुंबई हे केवळ एक कॅपिटल शहर आहे असे नाही तर मुंबई हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे. मुंबईसह गोवा हे देखील देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या दोन्ही शहरांमध्ये रोजाना हजारो पर्यटक येतात. शिवाय मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे.
दरम्यान मुंबई ते गोवा असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मुंबई-गोवा महामार्ग संदर्भात. खरंतर या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार असा दावा केला जात होता.
पण या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार नाहीये. यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या महामार्गाने जलद प्रवास करण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. परंतु या मार्गावरील एक महत्त्वाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण झाले आहे.
ते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा या मार्गावरील कशेडी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन देखील यशस्वी झाली आहे. यामुळे आता या बोगद्याची एक लेन सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार कशेडी बोगद्याची एक लेन 11 सप्टेंबर 2023 पासून म्हणजेच आजपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. ही एक लेन हलक्या वाहनांसाठी खुली केली जाणार आहे. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणारी लेन आज पासून हलक्या वाहनांसाठी खुली केली जाणार आहे.
काय फायदा होणार?
सध्या स्थितीला मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात प्रवास करण्यासाठी 40 मिनिटांपर्यंतचा वेळ प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. शिवाय घाटातील प्रवास खूपच आव्हानात्मक आहे. अनेकदा घाटात वाहतूक कोंडीची समस्या उदभवली आहे तर कित्येकदा या घाटात अपघातही झाले आहेत.
अशा स्थितीत ही जीवघेणी वाहतूक सुरक्षित करण्यासाठी कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याचे बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असून आता या बोगद्याची एक लेन म्हणजेच मुंबईकडून गोव्याच्या दिशेकडे जाणारी लेन आजपासून प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे.
या लेनने केवळ हलकी वाहने धावू शकणार आहेत. हा बोगदा सुरू झाल्यानंतर चाळीस मिनिटांचा प्रवास फक्त आठ ते दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वीच या लेनला सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.