Mumbai To Nashik Travel : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही काही प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश होतो. मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे.
आतापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक सुरू आहे. सुरुवातीला डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520km लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला.
यानंतर 2023 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. तसेच या चालू वर्षात समृद्धी महामार्गाचा 25 किलोमीटर लांबीचा अर्थात भरवीर ते इगतपुरी हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे.
उर्वरित 76 किलोमीटर लांबीचा म्हणजेच इगतपुरी ते आमने या टप्प्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाच्या याच शेवटच्या टप्प्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खुला होणार आहे.
हा टप्पा खुला झाल्यानंतर नाशिक ते मुंबई हा प्रवास जलद होणार आहे. नाशिककरांना या मार्गामुळे जलद गतीने मुंबईत जाता येणार आहे. हा 76 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर इगतपुरी ते आमने हा प्रवास फक्त 40 मिनिटात होऊ शकणार आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एम एस आर डी सी च्या व्यवस्थापकीय संचालकांनी मोठी माहिती दिली आहे.
एम एस आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी सांगितल्याप्रमाणे, सध्या इगतपुरी ते संग्रीला रिसोर्ट हे ७६ किमीचे अंतर पार करण्यासाठी दीड तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय.
मात्र जेव्हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल तेव्हा हा प्रवास फक्त 40 मिनिटात होणार आहे. एकंदरीत पुढील महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्ग लवकरच खुला होणार आहे.
मात्र, शेवटच्या टप्प्यात विकसित होत असलेल्या शहापुरातील पूलाचा एक भाग हा ऑगस्टच्या अखेरीस सुरू होणार आहे आणि तदनंतर दोन महिन्यांनी या पुलाचा दुसरा भाग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास जलद होणार आहे.