Mumbai Trans Harbour Link Toll Rate : मुंबई शहरात आणि उपनगरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश होतो. या प्रकल्पाअंतर्गत शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान एक सागरी ब्रिज तयार केला गेला आहे.
21.08 किलोमीटर लांबीचा हा सागरी ब्रिज देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी ब्रिज म्हणून ओळखला जाणार आहे. या पुलाला देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचे नाव देण्यात आले आहे. खरे तर हा ब्रिज 25 डिसेंबर 2023 ला सुरू होणार होता.
हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अर्थातच अटल सेतू 25 डिसेंबर म्हणजेच दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून आखण्यात आले होते.
मात्र हा सागरी सेतू नियोजित वेळेत पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे याचे उद्घाटन लांबणीवर पडले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी नियोजित वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार नसल्याने हा प्रकल्प पुढील वर्षी अर्थातच 2024 जानेवारी अखेरपर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती दिली होती.
दरम्यान नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अटल सेतू 12 जानेवारी 2024 ला सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी महत्त्वाची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे या ब्रिजचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर फक्त 15 ते 20 मिनिटात पूर्ण होणारा असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास देखील फक्त 90 मिनिटांचा होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येथील आणि यादरम्यानचं या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे नियोजन आहे.
अशा परिस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती टोल भरावा लागणार हा सवाल उपस्थित केला जात होता. मध्यंतरी या सागरी मार्गावर प्रवास करण्यासाठी 500 रुपयांचा टोल लागणार असे बोलले जात होते.
मात्र एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर प्रवास करण्यासाठी 350 रुपयांचा टोल वाहन चालकांना भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून हा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.
उद्या अर्थातच 4 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल अशी माहिती समोर आली आहे.