Nagpur-Goa Expressway : समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर दरम्यान विकसित होत असलेला हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. याचा पहिला टप्पा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता.
त्यावेळी मोदींनी नागपूर ते शिर्डी पर्यंतचा 520 किलोमीटर लांबीचा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू केला होता. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते भरवीर 80 किलोमीटरचा मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू झाला.
दरम्यान, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गाचा उर्वरित टप्पा देखील लवकरच सुरू होणार आहे. संपूर्ण समृद्धी महामार्ग येत्या काही महिन्यात सर्वसामान्यांसाठी सुरू होईल अशी माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांना समृद्धी महामार्गाने थेट उपराजधानी नागपूर ते मुंबई पर्यंतचा प्रवास करता येणार आहे.
परिणामी प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल, इंधनात मोठी बचत होईल अशी आशा आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर दुसरीकडे राज्यातील एका नवीन महामार्गाची पायाभरणी लवकरात लवकर व्हावी यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उपराजधानी नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेस वे तयार करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. ते म्हणजे प्राधिकरणाने या नव्याने विकसित होणाऱ्या मार्गासाठी आवश्यक असलेले अंतिम संरेखन अर्थातच अलाइनमेंट नुकतेच पूर्ण केले आहे.
यानुसार या महामार्गाची लांबी 805 किलोमीटर एवढी राहणार आहे. सुरुवातीला अंदाजीत अलाइनमेंट सादर करण्यात आले होते यामध्ये या मार्गाची लांबी 760 किलोमीटर राहील असे बोलले जात होते. परंतु हा एक ढोबळमानाने लावलेला अंदाज होता.
आता मात्र प्राधिकरणाने हे अलाइनमेंट अंतिम करताना वेगवेगळ्या बाबींचा विचार केला आहे आणि यानुसार हा मार्ग 45 किलोमीटरने वाढला असून याची लांबी 805 किलोमीटर राहील असे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे आता या अंतिम अलाइनमेंटला मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवले जाणार आहे. दुसरीकडे या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल आणि नंतर या आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी घेतली जाईल अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर येत आहे.
खरे तर हा महामार्ग नागपूर ते गोवा असा राहणार आहे मात्र या मार्गाची सुरुवात वर्धा येथील पवनारेतून होणार आहे. कारण की, नागपूर ते वर्धा यादरम्यान शक्तीपीठ महामार्ग आहे. म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळांना जोडणारा शक्तीपीठ मार्ग विदर्भातील वर्धा येथून सुरू होणार आहे.
तसेच हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. दरम्यान या मार्गासाठी 11,000 हेक्टर जागा आवश्यक राहणार आहे. म्हणजे 11000 हेक्टर जागेत हा 805 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे.