Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. सध्या राज्यात मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून या महामार्गाचे आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहेत.
आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. दरम्यान याच महामार्गाच्या धर्तीवर राज्यात आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग विकसित होणार आहे.
नागपूर ते गोवा दरम्यान समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा महामार्ग तयार होणार आहे. नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाची लांबी समृद्धी महामार्गापेक्षा 101 किलोमीटरने अधिक राहणार आहे. शक्तीपीठ महामार्ग विकसित झाल्यानंतर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरेल.
दरम्यान याच महामार्गाचे आता प्रत्यक्षात काम सुरू झाले असल्याची बातमी समोर येत आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात प्रांतअधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरंतर या महामार्गासाठी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध दाखवला आहे.
यामुळे या मार्गासाठी संपादन करताना प्राधिकरणाला विशेष अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तथापि संपादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रांत अधिकारी यांची नियुक्ती झाली असल्याने लवकरच या मार्गासाठीचे संपादन पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे.
कसा असेल मार्ग ?
हा मार्ग वर्धा येथील पवनार जवळील दिगरज येथून सुरु होईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या बांदा येथील पत्रा देवी पर्यंत तयार केला जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 60 आणि सांगली जिल्ह्यातील 19 गावांमधून हा मार्ग विकसित होणार आहे. हा महामार्ग राज्यातील अनेक तीर्थक्षेत्रांना जोडेल.
याच्या उभारणीसाठी 86 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग धार्मिक पर्यटनासाठी खूपच मोलाचा ठरणार आहे. समृद्धी महामार्ग ज्या जिल्ह्यांना जोडला गेलेला नाही त्या जिल्ह्यांना शक्तीपीठ महामार्ग कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना कनेक्ट करणार असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
गेल्या एका वर्षापासून या महामार्गाच्या उभारण्यासाठी तयारी सुरू होती. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणीचा अभ्यास केला होता. यानुसार या महामार्गाचे आखणी अंतिम करण्यात आली असून या आखणीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
सर्व मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने राजपत्र व अधिसूचना सुद्धा जाहीर केली आहे. यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यांतील 12 हजार 589 इतक्या गट नंबरमधील 27 हजार 500 एकरांतून हा महामार्ग विकसित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास सुसाट होणार आहे. हा महामार्ग राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हा महामार्ग तयार होणार आहे. पण, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अनेक शेतकरी व गावागावांतून विरोध होत आहे. अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ एकत्रित येत शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभे राहिले आहेत. त्यामुळे आता या महामार्गाच्या भूसंपादनासाठी सरकार कशी भूमिका घेते, हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.