Nagpur Goa Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. तर काही प्रकल्पांची कामे येत्या काही महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यादरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे.
सध्या स्थितीला या मार्गाचा सहाशे किलोमीटरचा भाग सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरित 101 किलोमीटरचा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच आता नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या शक्तीपीठ महामार्ग संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.
या महामार्गात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा श्री ज्योतिबासह आता आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिराचा देखील समावेश होणार आहे.
त्यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या प्रस्तावित मार्गामुळे भाविकांना राज्यातील तीन शक्तीपीठांचे सहजतेने दर्शन घेता येणार आहे.
या महामार्गाची लांबी 800 किलोमीटर एवढी राहणार असून या महामार्गावर राज्यातील 20 धार्मिक स्थळांचा समावेश राहणार आहे. दरम्यान या महामार्गाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आढावा घेतला आहे.
या प्रकल्पाची आढावा बैठक सह्याद्री अतिथिगृहावर संपन्न झाली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना या मार्गाच्या कामाची अधिसूचना लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
खरंतर या महामार्गात आदमापुर येथील श्री बाळूमामा मंदिराचा देखील समावेश झाला पाहिजे अशी मागणी होती. याच पार्श्वभूमीवर आता या धार्मिक स्थळाचा या महामार्गात समावेश झाला आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग राधानगरी-दाजीपूर अभयारण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. यामुळे या अभयारण्याला भेटी देणाऱ्या पर्यटकांना देखील या मार्गाचा फायदा होणार आहे.
हा मार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहे. या मार्गावर जे धार्मिक स्थळे येणार आहेत त्या धार्मिक स्थळांसाठी मुख्य महामार्गापासून जोड रस्ता तयार केला जाणार आहे.
दरम्यान या बैठकीनंतर आता या मार्गाचे काम सप्टेंबर महिन्यात सुरु होऊ शकते अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत या मार्गाचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासन आग्रही असून नियोजित वेळेत या मार्गाचे काम सुरू होईल असे आता बोलले जाऊ लागले आहे.