Namo Shetkari Yojana : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आणि नवीन शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तारूढ झाले. सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे सरकारने वेगवेगळे निर्णय घेतलेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या वर्तमान सरकारने विविध घोषणा केल्यात आणि वेगवेगळ्या योजनांची मुहूर्तरोढ रोवली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्तमान शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तथा त्यावेळी वित्तमंत्रीपदावर कार्यरत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेची घोषणा केली. ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे.
ज्याप्रमाणे पीएम किसान अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात त्याचप्रमाणे नमो शेतकरी अंतर्गत देखील सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एका आर्थिक वर्षात तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना देऊ केले जाणार आहेत.
पीएम किसानचे जसे स्वरूप केंद्र शासनाने ठेवले आहे तसेच स्वरूप नमो शेतकरी योजनेचे शिंदे फडणवीस सरकारने ठेवले आहे. मात्र असे असले तरी या योजनेचा पहिला हप्ता अजूनही पात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे अखेर या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार? हा मोठा प्रश्न राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
या योजनेची घोषणा होऊन आता जवळपास सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. पण तरीही या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नसल्याने शेतकरी संभ्रमा अवस्थेत आहेत. वास्तविक नमो शेतकरीचा पहिला हप्ता हा पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हफ्त्यासोबतच वितरित होईल असा दावा केला जात होता.
परंतु पीएम किसानचा 14 वा हप्ता हा 27 जुलै रोजी वितरित झाला. म्हणजेच आता पीएम किसानचा हप्ता वितरित होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे. तरी देखील या नमो शेतकरीचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकलेला नाही. खरंतर पीएम किसानसाठी जें शेतकरी पात्र ठरतील त्यांनाच नमो शेतकरीचा लाभ दिला जाणार आहे.
मात्र अद्याप पीएम किसानचे लाभार्थी निश्चित होत नसल्याने नमो शेतकरीचा हप्ता वितरित करण्यास उशीर होत असल्याचे कारण पुढे केले जात आहे. दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पहिला हप्ता हा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्याही परिस्थितीत वर्ग होऊ शकतो असा दावा केला जात आहे.
यामुळे आता नमो शेतकरीचा पहिला हप्ता खरच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार का? आणि त्यांना दिलासा मिळेल का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.