Nashik-Ahmedanagar-Pune Railway : नासिक आणि पुणे ही दोन शहरे महाराष्ट्रातील नासिक, मुंबई पुणे या सुवर्ण त्रिकोणातील अतिशय महत्त्वाची शहरे आहेत. या सुवर्ण त्रिकोणापैकी राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांचा तुलनात्मक विकास अधिक झाला आहे. नासिक तुलनेने कमी विकसित आहे. विशेष असे की, नासिक ते पुणे यादरम्यान स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही थेट रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही.
यामुळे नाशिकच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून खरंच प्रयत्न केले जात आहेत का हा सवालही येथील नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरंतर, नासिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. हेच कारण आहे की, या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र घोषणा झाल्यानंतरही या प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही.
वास्तविक, नासिक-पुणे हा देशातील पहिलावहिला सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प राहणार असा दावा केला जात होता. पण देशातील पहिला सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यात तयार झाला आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू देखील झाला आहे. यामुळे देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचा बहुमान आता उत्तर प्रदेश या राज्याकडे आहे.
उत्तर प्रदेश राज्याने राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर जो प्रकल्प महाराष्ट्रात पहिला पूर्ण झाला पाहिजे होता तो प्रकल्प पूर्ण करून दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे स्वप्न भंगले आहे. नासिक, अहमदनगर, पुणे समवेतच संपूर्ण महाराष्ट्राचा यामुळे भ्रमनिरास झाला आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रमावस्था देखील पाहायला मिळत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दोन दिवसांपूर्वी दिल्ली ते मेरठ या सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला आहे. दिल्ली ते मेरठ येथील मोदीपुरम दरम्यान 82 किलोमीटर लांबीचा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प विकसित केला जात आहे.
याच प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच साईबाबाद ते दुहाई दरम्यानचा 17 किलोमीटर चा मार्ग सुरू झाला आहे. हा मार्ग आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू देखील करण्यात आला आहे. या मार्गावरील गाडीला रॅपिडेक्स ट्रेन तसेच नमो भारत ट्रेन म्हणून ओळखले जात आहे. या मार्गावर तब्बल 180 किलोमीटर प्रतितास या वेगाने गाड्या धावणार आहेत.
एकंदरीत, उत्तर प्रदेश राज्याने राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर तेथील जनतेसाठी सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुरु करून दाखवला आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय नेतृत्वाने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नाशिक-पुणे High Speed Railway प्रकल्पाला अपेक्षित गती मिळू दिली नाही.
यामुळे नासिक अहमदनगर पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प खरच पूर्ण होईल का? हा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे. नासिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा एकूण 232 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे नासिक, नगर आणि पुणे ही तीन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या शहरा दरम्यानचा प्रवास या प्रकल्पामुळे गतिमान होणार आहे.
या परिसरातील औद्योगिक शैक्षणिक आणि पर्यटनात्मक विकास या प्रकल्पाने सुचित होणार आहे. मात्र हे जरी शाश्वत खरे असले तरी देखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून राज्य शासनाच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जात आहेत हा सवाल संतप्त जनतेच्या माध्यमातून यावेळी उपस्थित केला जात आहे.
वर्तमान उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाबाबत आता तत्परता दाखवायला सुरुवात केली आहे मात्र गेल्या पाच वर्षांपासून या प्रकल्पावर फक्त आणि फक्त राजकारणच झाले आहे. यामुळे, या परिसरातील विकास किमान दहा वर्षांपर्यंत मागे खेचला गेला असल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त होत आहे.