Navi Mumbai Cidco Home : मुंबई, नवी मुंबई यांसारख्या महानगरात अलीकडे घर घेणे मोठे खर्चिक काम बनले आहे. घरांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत असल्याने सर्वसामान्यांना या भागात घर घेणे म्हणजे खूपच अवघड वाटू लागले आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई सारख्या महानगरात घर घेण्यासाठी म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
सिडकोकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांमुळे नवी मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सिडकोने विकसित केलेल्या अनेक गृहप्रकल्पांना नागरिकांनी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.
दरम्यान, परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या सिडकोने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. सिडकोने आपल्या एका महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पातील घरांच्या किमती तब्बल सहा लाखांनी कमी केल्या आहेत.
विशेष म्हणजे या गृहप्रकल्पातील घरांसाठी अडीच लाख रुपयांची पीएम आवास योजनेची सबसिडी देखील मिळत आहे. त्यामुळे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असून सर्वसामान्यांना यानिमित्ताने दिलासा मिळणार आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण सिडकोने नेमक्या कोणत्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती सहा लाखांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या गृहप्रकल्पातील घरांच्या किमती झाल्यात कमी ?
नवी मुंबईच्या उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानक भागामध्ये सिडकोने गृहप्रकल्प तयार केला आहे. गृहप्रकल्पातील घरांसाठी साधारणतः दोन वर्षांपूर्वी योजना जाहीर करण्यात आली होती. 4,869 घरांसाठी योजना जाहीर करण्यात आली होती आणि या योजनेची सोडत गेल्यावर्षी निघाली.
4,869 घरांसाठी विजेत्यांची निवडही झाली आहे. मात्र, या गृहप्रकल्पात समाविष्ट असलेल्या घरांच्या किमती खूपच अधिक असल्याने घरांच्या किमती कमी झाल्या पाहिजे त्यासाठी अर्जदारांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला.
ही सारी घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होती. पण, या घरांची किंमत 35 लाख 50 हजार रुपये एवढी होती. त्यामुळे ही किंमत कमी झाली पाहिजे अशी मागणी अर्जदारांनी केली आणि यावर कारवाई करत सिडकोने 6 लाख रुपयांपर्यंत या घरांच्या किमती कमी केल्यात.
विशेष म्हणजे या घरांसाठी अडीच लाख रुपयांचे पीएम आवास योजनेचे अनुदान देखील लागू होते. त्यामुळे हे 35 लाख रुपयांचे घर अवघ्या 27 लाखात अर्जदारांना उपलब्ध होत आहे.
पण, अर्जदारांच्या माध्यमातून या घरांसाठी अजूनही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीये. या सोडतीमध्ये विजयी झालेल्या अर्जदारांनी अजूनही घरांसाठी प्रतिसाद दाखवलेला नाही. यामुळे सिडकोची अडचण वाढली आहे.